महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गाव तिथे बिअर बार' चंद्रपूरातील महिला उमेदवाराचं अनोखे आश्वासन - दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्तात दारू

चिमूर विधानसभा मतदारसंघातील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराने मतदारांना आगळे-वेगळे आश्‍वासन दिले आहे. त्यांनी दारिद्र्य रेषेखालील जनतेला सवलतीच्या दराने मद्य मिळवून देणार आणि जिल्ह्यातील दारूबंदी हटवणार, असे जाहीर केले आहे.

चिमूर विधानसभा मतदारसंघ

By

Published : Oct 17, 2019, 3:53 PM IST

Updated : Oct 19, 2019, 4:16 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये वनिता राऊत या एकमेव महिला उमेदवार आहेत. निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष अथवा उमेदवार आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असतो. चिमूरच्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या राऊत यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात समाजात मान्यता नसलेल्या दारू व्यसनाविषयी अजबच योजना राबवण्याचे जाहीर केली आहे. त्यांच्या या दारूबंदी हटवण्याची घोषणा आणि इतर सर्व घोषणा सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.

'गाव तिथे बिअर बार' चंद्रपूरातील महिला उमेदवाराचं अनोखे आश्वासन

गाव तिथे बियर बार .. दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्तात दारू

राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू केली आहे. मात्र कडक कायदे व पुरेसे मनुष्यबळ यांच्या अभावी जिल्ह्यात सर्वत्र पूर्वीपेक्षा तिप्पट भावाने दारू उपलब्ध होत आहे. मध्यतरी दारूबंदी हटवण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून जिल्ह्यात मोठे राजकारण सुरू झाले होते. यातच राज्यात विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली. यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघातील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराने चक्क 'दारूबंदी हटलीच पाहिजे' अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा... धक्कादायक.. भाजपनंतर आता काँग्रेसचा टी शर्ट घालून तरुणाची आत्महत्या

पत्रकात दारू पिणे ही सामाजिक प्रथा जाणवत असल्याचे सांगण्यात आले. दारुबंदीला सामाजिक मान्यता मिळत नसल्याने ती प्रत्यक्षात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी परिसरातील जनता चोरून-लपून व दुप्पट-तिप्पट भावाने दारू खरेदी करून पीत असल्याची खंत व्यक्त केली आहे. दारूमुळे कुटुंब उध्वस्त होतात हा एक तर्क असून, नवरा-बायको, पोरं मिळून जसे जेवण करतात तसेच एकत्र बसून दारू प्यायल्यास त्यांच्यात वाद होणार नाही. घरीच ऑम्लेट चखना खाऊन त्यांचेही आरोग्य सुधारणार! असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा...'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या

यात राऊत यांनी जाहिरनाम्यात पुढे असे सांगितले आहे की, लोक सण-उत्सव यात नाचतात, गातात आणि आनंद साजरा करतात. तसेच पर्यटन स्थळांना भेट दिल्यावर देऊन कोंबडा-बकरा खातात तर लग्न-समारंभात डीजे वाजवून आनंद साजरा करतात असतात. अशावेळी मनोरंजनात मग्न लोकांना पाहता जनता सुखी संपन्न असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या आनंदी लोकांना दारू पिण्यापासून वंचित ठेवणे, ही मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आपण आमदार म्हणून निवडून आल्यास दारूबंदी हटविण्यासह, गावा-गावातील बेरोजगार तरुणांना दारू विक्रीचे परवाने व गाव तिथे बियर बार ही योजना राबवणार आहोत. तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत मद्य उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा.... 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न

Last Updated : Oct 19, 2019, 4:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details