चंद्रपूर- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील गिरगाव, कोसंबी गवळी, नवेगाव पांडव व गोविंदपूर या ग्रामपंचायतीच्या चार सरपंचांसह विविध ग्रामपंचायतमधील सदस्यांची पदे रद्द केली आहेत. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका ठेऊन जिल्हाधिकाऱयांनी त्यांचे पद रद्द करण्याचे आदेश काढले. तालुक्यातील चार सरपंचांसह ७१ ग्रामपंचायत सदस्यांचे सभासदत्व रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १० - १ ( अ ) अन्वये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विहित मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही. यात नागभीड तालुक्यातील गिरगावचे सरपंच प्रशांत गायकवाड, कोसंबी गवळीच्या सरपंच रंजुताई गायकवाड, नवेगाव पांडवच्या सरपंच शर्मीलाताई रामटेके व गोंविदपुरचे उमाजी खोब्रागडे यांच्या पदांसह इतर ग्रामपंचायत सदस्य असे एकूण ७१ पदाधिकाऱ्यांचे पद रद्द करण्यात आल्याचे आदेश ४ नोव्हेंबरला देण्यात आले आहेत.