चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी देशातील जनतेला एकजूट दाखवण्यासाठी रविवारी रात्री ९ वाजता 9 मिनिटे दिवे लावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पाटण या गावात दिवे लावण्याचा नादात दोन घरे पेटल्याची घटना घडली आहे. या आगीत कुंदन देवराव उईके आणि श्रीहरी वाघमारे यांच्या घरातील रोख रक्कम, धान्य, घरातील इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
पाटण गावात दिवे लावताना दोन घरे पेटली... हेही वाचा...कोरोनाविरुद्ध लढा: नागपुरात पेटविले घरोघरी दिवे...!
पंतप्रधानांचा आव्हानानंतर रविवारी रात्री 9 वाजता वीजेचे दिवे बंद करून दिवे, मेणबत्ती लावण्यात आले. जिवती तालुक्यातील अनेक भागात दिवे लावले गेले. मात्र, जिवती तालूक्यातीलच पाटण गावात दिवे लावताना एक दुर्घटना घडली आहे. या गावातील कुंदन देवराव उईके, पल्लेझरी येथील श्रिहरी वाघमारे यांनीही दिवे लावले होते. दरम्यान दिव्याच्या ज्योतीमुळे घराने पेट घेतला आणि क्षणात सर्व घराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कुटूंबातील सदस्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी गावकरी मदतीला धावून आले.
गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत घरातील रोख रक्कम, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच पाटण येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी, बिट अमालदार साहेबराव कालापाहड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.