चंद्रपूर - विटांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गोंडपिंपरी तालुक्यातील सालेझरी-राळापेठ मार्गावर ही घटना घडली. ट्रॅक्टर पलटल्याने ट्रॅक्टरमध्ये असलेले तीन मजूर ट्रॅक्टरखाली दबले होते. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी गोंडपिंपरीतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
वीट वाहतुक करणारा ट्रॅक्टर पलटल्याने तीन जण गंभीर... चंद्रपूरातील गोंडपिंपरी तालुक्यातील घटना हेही वाचा....नंदूरबारमध्ये आदिवासी संस्कृती.. होलिका उत्सवात पुरुष करतात महिलांच्या वेशभूषा
गोंडपिपरी तालूक्यातील राळापेठ येथून विटा भरुन निघालेल्या ट्रॅक्टरचा सालेझरी मार्गावर स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला, यात ट्रॅक्टर पलटला. त्यामुळे विटांवर बसलेले तीन मजूर ट्रॅक्टर खाली दबले. यात ते तिघेही गंभीर जखमी झाले. दिलीप राजकोंडावार, दशरथ, गुडी ठेंगणे अशी जखमींची नावे आहेत. तिघेही पानोरा येथील रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळताच गोंडपिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहीती आहे.