चंद्रपूर-जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्याला वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना यातून बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मदतकार्यात हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जात आहे. 1994 सालानंतरचा हा सर्वात मोठा पूर असल्याचे बोलले जात आहे.
ब्रम्हपुरी तालुक्याला लागून वैनगंगा नदी वाहते. या नदीवर बांधण्यात आलेला गोसी खुर्द धरण प्रकल्प देखील काही अंतरावर आहे. धरण प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. याचा फटका ब्रम्हपुरी तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव, खरकाडा, निलज, लाडज, बेलगाव, कोलारी या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. या सर्व गावांचा संपर्क तुटला असून या गावात पाणी शिरले आहे. गांगलवाडी-आवळगाव, देऊळगाव-कोलारी, पारडगाव-ब्रम्हपुरी या मार्गावरून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने तो मार्ग बंद झालेला आहे.