चंद्रपूर - जातपंचायतीने एका कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत पावला. मात्र, त्याला खांदा देण्यासाठी समाजातील एकानेही पुढाकार घेतला नाही. शेवटी घरातील मुलींना आपल्या वडिलांना खांदा द्यावा लागला. ही घटना चंद्रपूर शहरातील आहे.
चंद्रपूरात शेवटी मुलींनीच दिला पार्थिवाला खांदा १५ वर्षांपासून जात पंचायतीचा बहिष्कार -
चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना आहे. रविवारी या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला. गेल्या १५ वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला.
बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरही कायम -
गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांना ७ मुली आणि २ मुले आहे. समाजातील कोणत्याही लग्नसमारंभ, समाजाचे कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमासाठी आपल्या परिवारासह प्रकाश ओगले जात नव्हते. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. आर्थिक दंड लावला केला होता. मात्र घरात ११ जणांचा उदरनिर्वाह करणे आधीच कठीण त्यात हा दंड भरणार तरी कुठून हा प्रश्नच होता. त्यामुळे प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला.
विदर्भात ३५ कुटुंबे ही भोगतात बहिष्कार -
याबाबत MPSC ची तयारी करणाऱ्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लागावला आहे. आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाचाविरूद्ध काही सामाजिक कार्यकर्तेही लढा देत आहेत. त्यांच्या मते समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडने, बहिष्कार टाकणे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसविण्याचे काम जात पंचायत करते. सध्या विदर्भात ३५ कुटुंबे अशा प्रकारचा जात पंचायतीचा बहिष्कार भोगत असल्याची बाब या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणली आहे.
नागपूर: 'माझाकडे रागाने का पाहतो' म्हणत गुंडांनी दोन तरुणांना चाकूने भोसकले!