चंद्रपूर - निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) च्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे, असा दावा या संघटनेने केला आहे. या संघटनेच्या पुढाकारातून शहीद दिनानिमित्त 23 मार्चला संपूर्ण देशभरात रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहे. या दिवशी तब्बल 90 हजार रक्तांच्या बॉटल्सचे संकलन करण्यात येणार आहे. हा एक विश्वविक्रम ठरणार आहे.
देशपातळीवर उपक्रम-
सध्या देशभरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. उन्हाळ्यात तर रक्तसाठा तळाला गेलेला असतो. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने रक्ताची चणचण आणखी तीव्र झाली आहे. यामुळे अनेक रुग्णांना रक्तच मिळत नाही आहे. यामुळे असंख्य नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहे. तर काहींचा या अभावी मृत्यू देखील झाला आहे. भविष्यात ही स्थिती आणखी खराब होऊ शकते. त्यामुळे यासाठी निमा संघटनेने पुढाकार घेतला आहे. देशात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी देशपातळीवर उपक्रम राबविण्यात येत आहे.