चंद्रपूर : रक्त संकलन करणाऱ्या वाहनांसाठी डीझल देण्यास पेट्रोलपंप चालकाने स्पष्ट नकार दिल्याने आता ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. कारण रक्त संकलन करणारे वाहनच बंद आहे. त्यामुळे रक्त संकलन अधिकाऱ्याने थेट चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांना पत्र लिहून डीझल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आधिच रक्त संकलनाच्या तुटवड्याची समस्या आणखी गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रक्तदान करणारे शिबिरं झाली ठप्प : जिल्ह्यात विविध उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात. याच माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीत रक्त सुरक्षित असते. संकलित केलेले रक्त वाहनांच्या माध्यमातून जिल्हा रक्तपेढीत सुरक्षित केले जाते. मात्र आता जिल्हा रक्तपेढीकडे वाहनच बंद असल्याचे सांगण्यात येत असल्याने रक्तदान शिबिरांच्या आयोजनावर याचा परिणाम होऊ लागला आहे.पेट्रोल पंपाकडून डीझल मिळत नसल्याने रक्त संकलन विभागाने थेट चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे यांच्याकडे पत्र लिहून डिझेल मिळण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. 8 मार्च ते 12 मार्च 2023 दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या रक्तदान शिबिरात जमा झालेलं रक्त संकलित करून ते रुग्णालयात आणण्यासाठी वाहनाची आवश्यकता होती. मात्र वाहनात डिझेल नसल्याने संकलन करायचे कसे हा प्रश्न होता. पेट्रोलपंपाची देयकं अद्याप प्रलंबित असल्याने सदर पेट्रोलपंप मालकाने डिझेल देण्यास नकार दिल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.