चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (BJP J P Nadda) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे (PM Narendra Modi Leadership) कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भारताने जगाला मागे टाकलं आहे. जगात प्रत्येक देश आव्हानांचा सामना करत असताना देखील पंतप्रधान देशाला सामोरे घेवून जात आहेत.
भारताची आर्थिक स्थिती मजबूत : दोनशे वर्षं देशावर राज्य करणारा ब्रिटन देश आर्थिक डबघाईस लागला आहे. मात्र, भारत ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. अमेरिका, रशिया आर्थिक मंदीचा सामना करीत आहे, अशा स्थितीत मोदींमुळे देशाची आर्थिक स्थिती ही संतुलित आहे. असेही ते म्हणाले. पूर्वी 52 टक्के मोबाइल हे भारताला आयात करावे लागत होते आता जगातील 97 टक्के मोबाईलचे उत्पादन हे भारतात केले जाते. रसायन आणि औषध आणि पोलाद क्षेत्रात भारत जगात अव्वल आहे. जेव्हा जगाची अर्थव्यवस्था डळमळीत होत आहे अशावेळी भारताची आर्थिक स्थिती मजबूत आहे, असा दावा त्यांनी केला.
मास्क न लावता फिरतोय : आज उपस्थित जनसमुदायापैकी कोणीही मास्क लावलेला नाही. सगळे निवांत एकमेकांजवळ दाटीवाटीने बसलेले आहेत. अमेरिकेने अद्याप कोरोनाने लसीकरण पूर्ण केलेले नाही. युरोपचेही तसेच चीन कोरोनाशी कसा झुंज देतो आहे हेही आपण बघतोय. तर इकडे मोदींजींच्या नेतृत्वात भारतात 220 कोटी लसी देण्यात आल्या. यात डबल डोझ, बूस्टर डोझचा समावेश आहे. जर तुम्हाला प्रकाश माहिती असेल तर अंधारही तुम्हाला माहिती हवा. जग जेव्हा समस्यांच्या अंधारात होतं त्यावेळी आपण काय करत होतो आणि किती सुरक्षित होतो याची जाणीव होणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.