चंद्रपूर - मागील काही दिवसांपासून इको-प्रो या सामाजिक संघटनेने शहराच्या मध्यभागी असणाऱ्या ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी कंबर कसली असून इकोप्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला चंद्रपुर भारतीय जनता पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपा महानगर भाजपाच्या शिष्टमंडळाने या संदर्भात धोत्रे यांच्याशी सविस्तर चर्चा करून स्थिती जाणून घेतली. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बंडू धोत्रे यांचेशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळात महापौर राखि कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, दत्तप्रसंन्न महादानी, माध्यम संपर्क प्रमुख प्रशांत विघ्नेश्वर, मंडळ प्रमुख रवी लोणकर, सचिव रामकुमार अकापेललिवार, निखिल तांबेकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
इको-प्रोच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा; मुनगंटीवारांचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन - protest For conservation of Ramala Lake news
इको-प्रो या सामाजिक संघटनेने शहराच्या मध्यभागी असणाऱ्या ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी कंबर कसली असून इकोप्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला चंद्रपुर भारतीय जनता पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे.
बंडू धोत्रे यांच्या भेटीपूर्वी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्याशी या प्रकरणावर चर्चा केली. तलाव मनपाच्या अखत्यारीत येत नाही याकडे लक्ष वेधत तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नासाठी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन यासाठीच्या जुन्या पत्रांचा संदर्भ देऊन सादर केले. या भेटी नंतर शिष्टमंडळाने धोत्रे याची भेट घेतली. यावर चर्चा करतांना बंडू धोत्रे यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासन, रेल्वे, पुरातत्व विभाग, वेकोली, प्रदूषण मंडळ व मनपाच्या समन्वयाची गरज प्रतिपादित केली.
खनिज विकास निधीतून सर्व कामे होऊ शकतात. याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझे आंदोलन कुणाच्या विरोधात नसून जनतेच्या आरोग्यासाठी आहे. जनतेला ज्या दिवशी हे कळेल तेव्हा शासनाचे डोके ताळ्यावर येईल, असे ते म्हणाले. २००८ पासून हा लढा सुरू आहे. आता सहनशक्ती संपली. तलावातील सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी देखील प्रदूषित होत आहे. मासोळ्या पाण्यात नाही तर वर येऊन श्वास घेतात. तलाव नष्ठ होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावर शिष्टमंडळाने सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने संबंधित सर्व घटकांशी संवाद साधून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.