चंद्रपूर - आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही भाजपचेच कार्यकर्ते आहोत, समोरही राहणार, असे असतानाही आमची साधी कामे सुद्धा का होत नाहीत? यासाठी आम्हाला आमदाराच्या कार्यकर्त्याला पैसे का द्यावे लागतात? असा खडा सवाल एका कार्यकर्त्याने चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांच्या समोरच उपस्थित केला. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
होय आम्ही भाजपचेच, मग आमची कामे का होत नाहीत? कार्यकर्त्याचा आमदारांना प्रश्न - BJP News
मी जुना भाजप कार्यकर्ता असूनही माझी कामे का होत नाहीत, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने आमदार बंटी भांगडिया यांना केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

चिमूर मतदारसंघात भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी ते भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. अशाच एका बैठकीत आमदार भांगडियांसमोरच एका कार्यकर्त्याने तक्रारींचा पाढा वाचला. यावर भांगडियादेखील निरुत्तर झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुण कार्यकर्त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्ती केली. आम्ही पिढ्यानपिढ्या भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि समोरही राहणार. मात्र, आमचीच साधी कामे होत नाहीत. यासाठी आमदार साहेबांच्या जवळच्या लोकांना पैसे द्यावे लागतात. तेव्हाच आमचे काम होते, हे आमचे दुर्दैव आहे.
शिलाई मशीनसाठी चारदा अर्ज केला. मात्र, तो बेदखल करण्यात आला. माझ्या मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मदतीसाठी मी आमदार भांगडिया यांची दोनदा भेटही घेतली. त्यांनी ही जबाबदारी दुसऱ्याला दिली. वारंवार फोन करूनही त्या व्यक्तीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मला कुठलीच मदत मिळाली नाही. मला बुक आणि पावती मिळाली नाही. यासाठी माझ्या गावातील शेतीची कामे सोडून मी भर पावसात अनेकदा चिमूर येथे हेलपाटे मारले तरीही काम झाले नाही. अखेर आमदार भांगडिया यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला पाचशे रुपये द्यावे लागले. ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.