चंद्रपूर - कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले जात होते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना चंद्रपूर महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता अशा रुग्णालयावर मनपाची नजर असणार आहे. यासाठी मनपाकडून 17 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
शहरातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. मात्र शासनाने निर्धारीत केलेल्या मर्यादे व्यतिरिक्त खासगी रुग्णालये अवाजवी दराने देयके आकारुन रक्कम कोरोना रुग्णांकडून वसूल केली जात आहे. या व्यतिरिक्त रुग्णांना भरती करताना आगाऊ रकमेची मागणी केली जात आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे यावर आळा घालण्यास चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने विविध खाजगी रुग्णालयांसाठी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
कोरोना बाधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार झाल्यावर यापुढे रुग्णांची देयके ही महानगरपालिका प्रशासनाने नेमलेल्या ऑडीटरद्वारे प्रमाणीत करून घेतल्याशिवाय अंतिम होणार नसून, प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक खाजगी रुग्णालयाला बंधनकारक आहे. संबंधीत रुग्णालय प्रशासनाने याबाबत कुठलीही कुचराई केल्यास त्यांच्यावर उचित नियम व कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद गांभीर्याने घेण्याचे महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. शासन आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे.
महानगरपालिका प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी 2 अधिकारी याप्रमाणे 17 टीमची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त जर बिल रकमेत तफावत आढळली किंवा रुग्णांकडून अवाजवी रक्कम घेतली असल्याचे आढळल्यास त्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे. यातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.