चंद्रपूर - कोरोनाच्या काळात जिम, व्यायामशाळा, स्टेडियम, पार्क बंद असल्याने सायकलला मोठी मागणी प्राप्त झाली आहे. अनेकांनी स्वतःला फिट ठेवण्यासाठी महागड्या सायकली विकत घेतल्या. ही संधी साधून एका सायकल दुरुस्ती करणाऱ्याने अशा सायकल चोरी करण्याचा सपाटा लावला. रामनगर पोलिसांनी या सायकलचोराला अटक केली आहे. अब्दुल हमीद शेख असे या आरोपीचे नाव आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत त्याने साधला डाव; सायकल कारागीर चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या आरोपी अब्दुलचे भद्रावती शहरात सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. सायकल चोरी करून आणायची आणि ती विकायची, असा सपाटाच त्याने लावला होता. त्याचे सायकल दुरुस्तीचे दुकान असल्याने कुणालाही याचा संशय आला नाही. मात्र, जेव्हा या सायकल चोराने आपला मोर्चा चंद्रपुरात वळवला तेव्हा तो पकडला गेला.
हेही वाचा -लहान मुलांना सांभाळा... कोरोनासह 'या' आजाराचा मुलं होतायेत शिकार
शहरातील साईबाबा वॉर्डातील एका व्यक्तीची महागडी सायकल चोरी गेली. याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. तपासात ही सायकल भद्रावती येथे आरोपीकडे सापडली. आणखी तपास केला असताना अशा तब्बल 8 सायकली जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या सायकलींची किंमत जवळपास 50 हजार रूपये आहे.
ही कारवाई रामनगर ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष देरकर, सहायक फौजदार प्रभूदास माऊलीकर, पोलीस हवालदार आनंद परचाके, गजानन डोईफोडे, शंकर येरमे, राम राठोड, निलेश मुळे, माजिद पठाण यांनी केली.