महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. सोनारकरांची आरेरावी कायम, वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ

चंद्रपूरमधील मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनारकर यांच्याबाबत आणखी एक तक्रार समोर आली आहे. हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जे गंभीर जखमी झालेत, ज्यांना कायमचे अपंगत्व आले अशा पीडितांना डॉ. सोनारकर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे पीडितांना वनविभागाकडून मोबदला मिळण्यास अडचण होत आहे. या पीडितांची व्यथा भूमिपुत्र ब्रिगेडने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणली आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनारकर
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनारकर

By

Published : Oct 15, 2021, 10:16 AM IST

चंद्रपूर - आपल्या वादग्रस्त शैलीने नेहमीच चर्चेत राहणारे मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनारकर यांची आणखी एक तक्रार समोर आली आहे. हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जे गंभीर जखमी झालेत, ज्यांना कायमचे अपंगत्व आले अशा पीडितांना डॉ. सोनारकर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे पीडितांना वनविभागाकडून मोबदला मिळण्यास अडचण होत आहे. या पीडितांची व्यथा भूमिपुत्र ब्रिगेडने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणली आहे.

पत्रकार परिषद

वादग्रस्त डॉ. सोनारकरांची पार्श्वभूमी

डॉ. भास्कर सोनारकर हे चंद्रपूरचे माजी आमदार नाना शामकुळे यांचे जावई आहेत. त्यामुळे आपले कोणीच काही करू शकत नाही या तोऱ्यात ते नेहमी असतात. असे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांना अनुभव आला आहे. सहकाऱ्यांशी उद्धट बोलणे, हेकेखोर व्यवहार, आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देणे अशा अनेक तक्रारी यापूर्वी त्यांच्याबाबत झाल्या आहेत. महिला सफाई कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करण्याचा गंभीर आरोप देखील यापूर्वी डॉ. सोनारकर यांच्यावर झाला आहे. कोरोनाच्या काळात रेमडीसीवीरच्या शासकीय कोट्यात हलगर्जीपणा बाळगण्याचे प्रकरण देखील त्यांच्या काळात गाजले. एकूणच डॉ. सोनारकर हे आपल्या वादग्रस्त शैलीने नेहमीच चर्चेत असतात.

चंद्रपुरातील पीडितांना नागपुरात जाण्याचा सल्ला

चंद्रपूर जिल्हा हा जंगलाने वेढलेला आहे, येथे वाघ, बिबट, अस्वलांचा मुक्तसंचार असतो. त्यामुळे वन्यजीवांचे हल्ले येथे नेहमीच होत असतात. त्यात वनविभागाकडून पीडिताला आर्थिक मदत दिली जाते. किरकोळ जखमीला 1 लाख तर गंभीर जखमी ज्यात कायमचे अपंगत्व आले अशांना पाच लाखांची मदत दिली जाते. मात्र, त्यासाठी सरकारी दवाखान्यातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. डॉ. सोनारकर हे वैद्यकीय अधीक्षक आहेत. त्यांच्याच स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र दिले जातात. मात्र, येथे गंभीर जखमी झालेल्या पीडितांना डॉ. सोनारकर हे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. असा पीडितांनी आरोप केला आहे. पायली भटाळी येथील 61 वर्षीय सुरेश खिरटकर यांच्यावर 26 जुलैला अस्वलानी हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. 22 तासानंतर सिटीस्कॅन मशीन नाही म्हणून त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. जेव्हा त्यांच्यावर उपचार होऊन ते परत आले, तेव्हा चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथे नेत्र विभागात तपासणी केली असता त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यास गेले असता तुमचा इलाज नागपुरात झाला त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्ही नागपुरातुन घ्या असे त्यांना सांगून परत पाठवले.

डीन यांच्या आदेशाला केराची टोपली

पीडित मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नितनवरे यांच्याकडे जाऊन असा काही नियम आहे का? विचारणा केल्यास त्यांनी असा कुठलाच नियम नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा डीन यांनी स्वतः डॉ. सोनारकर यांना त्वरित वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. मात्र, सोनारकर यांनी मी तुम्हाला प्रमाणपत्र देतो. मात्र, त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही असे म्हटले असा आरोप पीडिताच्या मुलाने पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे वनविभागाकडून अद्याप त्यांना मोबदला दिला नाही. अशा बेजबाबदार वैद्यकीय अधीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेत डॉ. अभिलाषा गावतुरे, भूमिपुत्र ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विवेक बोरीकर, पीडित सुरेश खिरटकर, त्यांचा मुलगा उपस्थित होते.

मी नियमानुसार काम केले : डॉ. सोनारकर

जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना नागपुरात पाठवले जाते. अशावेळी चंद्रपूर येथून प्रमाणपत्र दिले तर वनविभाग ते ग्राह्य धरत नाही. त्यामुळे मी रुग्णांना नागपुरातुन प्रमाणपत्र घेण्यास सांगतो. असे किती प्रस्ताव वनविभागाकडून नाकारण्यात आले यावर केवळ तीन ते चार असे उत्तर त्यांनी दिले. जे प्रमाणपत्र पीडीताला दिले आहे, त्यात सर्व उल्लेख केला आहे. सर्व आरोप निराधार आहेत. असे स्पष्टीकरण डॉ. सोनारकर यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले.

हेही वाचा -जागतिक हात धुवा दिवस : कोरोनामुळं पटलं हात धुण्याचे महत्व

ABOUT THE AUTHOR

...view details