चंद्रपूर -चंद्रपुरातील बार्टीच्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचे मानधन जाणीवपूर्वक रोखण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. युक्ती मल्टीपर्पज सोसायटीकडे हे प्रशिक्षण केंद्र असून या केंद्रात चालणाऱ्या व्यवहाराबाबत यापूर्वी देखील अनेक गंभीर आरोप झालेले होते. ईटीव्ही भारत'ने या प्रकरणाचे वार्तांकण केले होते. त्यानंतर बार्टीचे राज्याचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी याची दखल घेतली आहे. दरम्यान, गजभिये यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन ईटीव्ही भारतला दिले आहे. त्यामुळे वादग्रस्त युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
मानधन रोखण्यात आले - अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. ही स्वायत्त संस्था शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येते. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून, विद्यार्थ्यांना दर महा सहा हजार याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देखील दिला जातो. चंद्रपुरात हे प्रशिक्षण केंद्र चोर खिडकी जवळील युक्ती मल्टीपर्पस सोसायटीला देण्यात आली आहे. मात्र, येथे मोठा आर्थिक घोळ होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून वारंवार प्राप्त होत आहेत. फेब्रुवारी ते ऑगस्ट यादरम्यान झालेल्या प्रशिक्षण वर्गातील 150 पैकी 35 जणांना गैरहजर असल्याचे दाखवून त्यांचे मानधन रोखण्यात आलेले आहे. युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या संचालिका अनुपमा नगरकर-भुजाडे यांच्या मर्जी न राखल्याने त्यांच्यावर असा अन्याय करण्यात आला असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
ईटीव्ही भारतच्या पाहणीत आला गोंधळ समोर -ईटीव्ही भारतने प्रत्यक्ष पाहणी केली असता येथील गोंधळ चव्हाट्यावर आला होता. सीसीटीव्ही कॅमेरे केवळ देखाव्यासाठी सुरू होते, त्याची नियमित रेकॉर्डिंग देखील केली जात नव्हती. अनेक कॅमेरे हे बंद होते. बायोमेट्रिक मशीन हे काढून ठेवण्यात आलेली होती. ज्या ठिकाणी बायोमेट्रिक मशीन आहे ती दिसण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे याच युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या नागपुरात एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती ज्याची तक्रार देखील झाली. असे असताना देखील सीसीटीव्ही कॅमेरे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. बायोमेट्रिक मशीनमध्ये घोळ करून काही विद्यार्थ्यांना जाणीवपुर्वक गैरहजर दाखविण्यात आले तर जी मुले गैरहजर होती त्यांना हजर दाखविण्यात आले असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. यासंदर्भात ईटीव्ही भारतने पाठपुरावा करीत बातम्या लावल्या होत्या त्याची दखल राज्याचे बार्टी संस्थेचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी घेतली आहे.
काय म्हणाले महासंचालक -या संदर्भात महासंचालक गजभिये यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी मानधन मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची 80 टक्केहून अधिक हजेरी हवी होती. मात्र, काही विद्यार्थी आपली चूक लपवण्यासाठी असा आरोप करून दिशाभूल करतात. तरीही नियमानुसार याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
ह्या मुद्द्यांवर चौकशी हवी -या प्रकरणाची केवळ थातुरमातुर चौकशी होते की सखोल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार बायोमेट्रिक मशीनमध्ये घोळ करून त्यात हजर गैरहजर दाखवले जाते. मशीनमधले प्रिंटआउट काढून त्यात असे केले जाते. हे प्रिंट आऊट त्याच मशीनमधल्या सॉफ्टवेअर असण्याची काहीही शक्यता नाही. यात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींच्या म्हणण्यानुसार ज्याला बायोमेट्रिक मशीनचा लॉगिन पासवर्ड माहीती असते त्याला त्यात छेडछाड करणे सहज शक्य आहे. जर कॅमेरे नियमित सुरू नाहीत, तर विद्यार्थी बायोमेट्रिक मशीन वापरत आहे की नाही हे कसे कळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. जे कर्मचारी आहेत त्यांच्या बँक खात्यात मानधन जमा झाल्यावर ते कधी काढले जातात, किती काढले जातात, याचा साचेबद्ध पॅटर्न आहे का, व्यवस्थापनाच्या इतर खर्चाची रक्कम दाखवण्यात आली ती योग्य आहे, का याबाबत सखोल चौकशी झाली तर मोठे घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे. महासंचालक यांच्या आश्वासनानुसार खरच याची चौकशी होते का याकडे पीडित विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.