चंद्रपूर :चंद्रपूर शहरातील भानापेठ वॉर्डातील श्री बार आणि त्याच खाली असलेल्या दारूच्या दुकानामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांचे जीवन त्रस्त झाले आहे. माजी नगरसेवक अनुप पोरेड्डीवार यांच्या मालकीचे हे बार आहे. सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत येथे तळीरामांचा सुळसुळाट सुरू असतो. यथेच्छ शिवीगाळ आणि मद्यपान या ठिकाणी सुरू असते. त्यामुळे महिलांचे घराबाहेर निघणे देखील अवघड झाले आहे.
व्यवसाय ठप्प पडण्याच्या मार्गावर :बहुसंख्य असलेल्या धोबी समाजाचा व्यवसाय ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. या त्रासाने ग्राहकांनी देखील आपले कपडे धुणे, इस्त्री करणे, ड्राय क्लीन करणे याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बहुतांशी लोक आता घर विकुन दुसरीकडे येण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र बारमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे कोणीही ही घरे, मालमत्ता घेण्यास तयार नाही. बार मालक देखील ही समस्या सोडविण्यास कुठलेही सहकार्य करीत नसल्याने दाद कुणासमोर मागायची असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
छाया चौधरी त्रस्त नागरिक :भानापेठ वॉर्डात येणाऱ्या छाया चौधरी सांगतात, माझे 30 वर्षांपासून ड्राय क्लीनचे दुकान आहे. विशेषतः महिला ग्राहक माझ्याकडे अधिक येतात. मात्र जेव्हा आमच्या गल्लीत बिअरबार सुरू झाले तेव्हापासून माझ्या दुकानात शुकशुकाट आहे. कारण गल्लीत तळीरामांचा सुळसुळाट असतो. मद्यधुंद अवस्थेत अश्लील भाषेचा वापर केला जातो. त्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. हा फक्त माझाच प्रश्न नाही तर या गल्लीत राहणारा प्रत्येक नागरिक या समस्येमुळे त्रस्त आहे, असे त्या सांगतात.
माजी नगरसेवकाची मुजोरी : माजी नगरसेवक अनुप पोरेड्डीवार यांच्या मालकीचे येथे पूर्वी एक दारूचे दुकान होते. मात्र 2015 पासून जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बंद पडून मोडकळीस आलेले दुकान पडून पोरेड्डीवार यांनी येथे व्यावसायिक वापराकरीत इमारत तयार केली. मात्र, याच दरम्यान दारुबंदी उठली आणि खालच्या मजल्यावर पुन्हा दारूचे दुकान नव्याने थाटले. वर्षांनुवर्षे याच ठिकाणी दारूचे दुकान असल्याने याचा त्रास नागरिकांना नव्हता, मात्र पोरेड्डीवार यांनी चौथ्या माळ्यावर प्रशस्त असे श्री बिअर बार तयार केले. दारूच्या दुकानात मद्यप्राशनाची सोय नसते. मात्र अशा ग्राहकांना दारूची सोय वर बारमध्ये करण्यात आली आहे. खालून दारू घ्या आणि वर मनसोक्त प्या अशी सुविधा मद्यपिंसाठी केली गेली आहे. तसेच तळमजल्यात पार्किंगची सुविधा दाखवण्यात आली. मात्र सर्व मद्यपीना या अरुंद गल्लीत वाहने लावण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या गल्लीतून येजा करण्यासाठी त्रास होतो. रात्री येथे तळीरामांचा भरणा असतो. अश्लील शिवीगाळ देखील केली जाते.