चंद्रपूर - ब्रम्हपुरी तालुक्यातील पुराची परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. सद्यस्थितीत करण्यात येणारे बचावकार्य पुरेसे नसल्याने आता यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. बुधवारपासून लष्कराच्या दोन तुकड्या ब्रम्हपुरीत दाखल होणार आहे.
पूरग्रस्त ब्रम्हपुरी; बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण
ब्रम्हपुरी तालुक्याला वैनगंगा नदीला पुर आला आहे. नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे 33 ही दरवाजे उघडण्यात आल्याने याचा मोठा फटका ब्रम्हपुरी तालुक्याला बसला आहे.
वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे 33 ही दरवाजे उघडण्यात आल्याने याचा मोठा फटका ब्रम्हपुरी तालुक्याला बसला आहे.नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव, खरकाडा, निलज, लाडज, बेलगाव, कोलारी या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. या सर्व गावांचा संपर्क तुटला असून या गावात पाणी शिरले आहे. यासोबतच गांगलवाडी-आवळगाव, देऊळगाव-कोलारी, पारडगाव-ब्रम्हपुरी या मार्गावरून वाहणाऱ्या नाल्याला पुर आल्याने हा मार्ग बंद झालेला आहे.
पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना गावातुन बाहेर काढण्यासाठी रविवारपासून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनच्या 3 पथकांच्या माध्यमातून हे कार्य सुरू करण्यात आले होते. यासोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचे 4 पथकेही दाखल झाले आहे. सध्या प्रशासनाकडे 9 बोटी असून या माध्यमातून बचावकार्य सुरू आहे. मात्र ही सर्व व्यवस्था आता अपुरी जाणवू लागली आहे. त्यामुळे आता थेट लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे. बुधवारपासून लष्कराच्या दोन तुकड्यांच्या माध्यमातून हे बचावकार्य केले जाणार आहे. लष्कराकडे बचावकार्यासाठी मोठ्या सुविधा असल्याने हे बचावकार्य व्यापक पद्धतीने करता येणार आहे.