महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

August Revolution Day शेवटच्या क्षणापर्यंत बाबूराव शेडमाके यांची इंग्रजांशी झुंज - Revolutionary

थोर क्रांतिकारी ( Revolutionary ) शहिद वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके ( Baburao Pulesur Shedmake ) ज्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरोधात सशस्त्र उठाव केला. इंग्रजांच्या सेनेला त्यांनी जंगजंग पछाडले. त्यांच्या या शौर्याची दहशत सातासमुद्रापार राणी व्हिक्टोरियापर्यंत ( Queen Victoria ) गेली. शेडमाके यांना जिवंत किंवा मुर्दा पकडण्याचे फर्मान काढण्यात आले.

August Revolution Day
ऑगस्ट क्रांती दिन

By

Published : Aug 11, 2022, 7:46 PM IST

चंद्रपूर : या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, त्यातही अनेक थोर क्रांतिकारकांचे बलिदान आणि शौर्य अजूनही उपेक्षित असेच आहे. त्यापैकीच एक आहेत थोर क्रांतिकारी शहिद वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके ( Baburao Pulesur Shedmake ) ज्यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरोधात सशस्त्र उठाव केला. इंग्रजांच्या सेनेला त्यांनी जंगजंग पछाडले. त्यांच्या या शौर्याची दहशत सातासमुद्रापार राणी व्हिक्टोरियापर्यंत ( Queen Victoria ) गेली. शेडमाके यांना जिवंत किंवा मुर्दा पकडण्याचे फर्मान काढण्यात आले. मात्र, शहिद बाबूराव शेडमाके यांनी इंग्रजांसमोर गुढगे टेकले नाही. फौजफाटा घेऊन आलेल्या अनेक इंग्रजांचा त्यांनी खात्मा केला. मात्र, अखेर जवळच्याच लोकांनी फितुरी केली आणि इंग्रजांनी त्यांना कैद केले. शहीद बाबुराव शेडमाके वीरमरण पत्करत फासावर गेले, मात्र, या महान क्रांतिकारकाची ओळख इतिहासाच्या पानांत धूसर झाली.

शहिद वीर बाबुराव शेडमाके

जनतेवर जुलूमशाही -पूर्वी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पारंपरिक गोंड साम्राज्याचे वर्चस्व होते. मात्र, एकोणिसाव्या शतकात हे साम्राज्य इंग्रजांनी काबीज केले. इंग्रजांनी येथील जनतेवर जुलूमशाही सुरू केली. सावकारशाहीच्या दहशतीत जनता वावरत होती. दुष्काळ, नापिकीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली केली जात होती. हा अन्याय स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना वीर बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजांच्या जुलूमशाहीविरोधात बंड ( Rebellion against the British ) पुकारले. शहीद शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 मध्ये मोलमपल्ली (गडचिरोली) येथे झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण रायपूर (मध्यप्रदेश) येथे झाले. अठराव्या वर्षापर्यंत त्यांनी सामाजिक नीतिमूल्ये, दांडपट्टा, तलवार, भालाफेक, गुल्यारअसे युद्ध प्रशिक्षण घेतले. इंग्रज सरकारने उभारलेली सावकारशाही उपटून फेकण्यासाठी आपल्या सवंगाड्यांना घेऊन 24 सप्टेंबर 1857 ला 'जंगोम सेना' उभी केली. जंगोम या शब्दाचा अर्थ गोंडी भाषेत क्रांती, जागृती असा होतो.

इंग्रजाशी पहिली लढाई -इंग्रजांना हुलकावणी देणारे युध्द छेडण्यासाठी चांदागढ़ा शेजारी असलेला राजगढ़ परंगणा परिसर निवडला. तेथील इंग्रजाचे हस्तक असलेल्या रामशाह गेडाम या सरदारावर आपल्या सैन्यानिशी 7 मार्च 1858 रोजी हल्ला केला. त्यात रामशाह मारला गेला. नव नियुक्त कॅप्टन क्रिक्टन याला राजगढ परंगणी आपल्या हातून जाण्याची घटना हादरा देणारी ठरली. राजगढावरचा विजय शेडमाके यांच्या जीवनातील एक क्रांतीकारी घटना होती. या घटनेने ब्रिटीश सत्तेची घाबरगुंडी उडाली. वीर बाबुरावच्या मदतीला घोटचे जमीनदार व्यंकटराव आपल्या सैन्यानिशी आले. कॅप्टन क्रिकटनने चांदा (आजचे चंद्रपूर) वरून इंग्रजी सैन्याला वीर बाबुरावाच्या कारवाया रोखण्यासाठी पाठविले. 13 मार्च 1858 रोजी नांदगाव घोसरी येथे इंग्रजाशी पहिली लढाई झाली. त्यात इंग्रजी सैन्याचा दारुण पराभव झाला.

अशी झाली लढाई - इंग्रजांची विखुरलेली सेना परतुन येईल. या हेतुने बाबुराव आणि त्यांचे सैन्य गढीचुर्ला टेकडीवर आश्रयाला होते. टेकडीवर दगडांचा ढिग केला गेला. आसपासच्या गावातील बैलबंडीचे चाके गोळा करण्यात आली. इंग्रजांच्या सेनेने पहाटे ४.३० च्या सुमारास टेकडीला घेराव घातला. बंदुकीच्या नळ्यातुन टेकडीच्या दिशेने गोळ्यांचा मारा सुरू झाला. वीर बाबुरावच्या जंगोम सेनाही दगडाचा आडोसा घेवून शत्रुपक्षांना रक्तबंबाळ करू लागली. लढाईचा हा नवा प्रकार पाहुन इंग्रज सैन्याची तारांबळ उडाली. ब्रिटिश सैन्याने तिथून पळ काढला, त्यांचे अनेक सैनिक मारल्या गेले. अखेर युध्दविराम झाला. टेकडीखाली उतरून जंगोम सेनेने इंग्रजाच्या हस्तकांना पकडले. त्यांच्याकडील तोफा, बंदुका जप्त केल्या. इंग्रजाच्या हस्तकांनी जबरदस्तीने जमा केलेली धान्याची कोठारे बाबुरावांनी लोकांसाठी खुली करून दिली. वीर बाबुरावांनी इथल्याइंग्रजांच्या बाजून उभे राहणाऱ्या दगाबाजांना शिक्षा केली आणि फितुरांना आपल्या राज्यातून पळविले. यामुळे जनतेत देशाभिमान निर्माण झाला, या क्रांतीचे लोण सर्वदूर पसरले.

सगनापूर व बामनपेठेतीलही युद्ध जिंकले - 19 एप्रिल 1858 रोजी वीर बाबुराव यांनी आपल्या सैन्यासह समनापूर या गावी तळ ठोकला होता. क्रांतिकारी परगनात राजेश्वरराव, नरसिंगराव राजगोंड याच परगण्याचे जमीनदार होते. वीर बाबुरावाच्या क्रांतीने प्रेरित होऊनत्यांनी आपल्या सेनेचे नेतृत्व बाबुराव शेडमाके यांच्या स्वाधीन केले. जमीनदारांना तथा मोकासदारांना बोलावून त्यांना इंग्रजाचे वर्चस्व झुगारून देऊन त्यांची खंडणी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. जमीनदारांनी हे मान्य केले. इंग्रजांना येथून पिटाळून लावावे एवढेच ध्येय आता समोर होते. या स्वातंत्र्यसंग्रामा वीर बाबुरावांची सेने जनजागृती करून दक्षिण गोंडवनात फिरत होती. टोळ्या टोळ्यांनी फिरणारे हे क्रांतीवीरांचे सैन्य इंग्रजाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. सगनापूरच्या परिसरात इंग्रज सेना असल्याची गुप्तहेरांकडून माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सगनापुरच्या शिवेवर शेडमाके यांची सेना तळ ठोकून बसली. 19 एप्रिल 1858 रोजी सगणापुरच्या शिवेत आलेल्या इंग्रजी फौजेवर जोरदार हल्ला केला. जामगिरी, गुंडपल्ली, रेंगेवाही, कोनसरी ह्या गावाच्या जंगलाचा आडोसा घेवून तर संगणापूरच्या आजुबाजुच्या शिवेवर लपून असतील असा मागमूसही इंग्रज सेनेला नव्हता. इंग्रज सैनिक आत येताच तलवारी, बंदुका, गुल्लेरीने लढाई सुरू झाली. बाबुरावांचे सैन्य इंग्रजी सैन्यवर तुटून पडले. इंग्रजांची भव्य सेना बाबुरावाच्या थोड्या पण कल्पक गोंडीयन सेनेसमोर त्यांचा टिकावच लागला नाही. इंग्रज सेना वाटेल त्या मार्गाने सैरावैरा पळाली. इंग्रजांचा पराभव झाला.यानंतर वीर बाबुराव यांनी राजगढ, नांदगाव घोसरी, गढीचुली आणि समनापूर परंगणे येथे बाबूरावांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.

बामणपेठ युध्दातही इंग्रज हरले - यानंतर बाबूरावांनी आपला मोर्चा बामणपेठकडे वळविला. कारण इंग्रजाचे सैन्य बावणपेठच्या भयान जंगलात दडून बसल्याचे विश्वसनिय सुत्राकडून कळले होते. सूर्य अस्ताला गेला होता. पहारेकरी चौफेर लक्ष ठेवून होती. काही झाडावर चढून सूनसान मध्यरात्री शत्रुच्या पावलांचा आवाज ऐकत होते. जीव वाचवून पळालेली इंग्रजी सेना जंगलाच्या आश्रयाने हळुहळू एकत्र आली. 27 एप्रिल 1858 रोजी लपून बसलेली वीर बाबुरावांची 'जंगोम सेना' इंग्रजी सेनेवर तुटून पडली. चार तास घनघोर युध्द चालले, काही पळाले तर काही शरण आले. बाबुरावांची या युध्दातही विजय मिळवला.

चिचगुडीवर हल्ला दोन इंग्रज अधिकारी ठार - लॉर्ड डलहौसीच्या आदेशानुसार चांदाचे कलेक्टर कॅप्टन क्रिकटन चांदा ते सिरोंचापर्यंत टेलिफोनची तारे लावण्यासाठी टेलिफोन ऑपरेटर गार्ट लँड, हॉल आणि सहकारी पीटर यांची नेमणूक करून चिचगुडीला पाठविले.यामुळे वीर बाबुरावच्या क्रांती आंदोलनाला आळा बसणार होता. 29 एप्रिल 1858 रोजी वीर बाबुराव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रात्री अचानक चिचगुडी कॅम्पवर सशस्त्र हल्ला केला. त्यात गार्ट लँड व हॉल बाबुरावच्या हाताने मारल्या गेले, मात्र त्याचा सहकारी पिटर निसटला आणि आडमार्गाने चांदाला पोहचला.

कॅप्टन शेक्सपियरचा गुप्त खलीता -वीर बाबुरावाच्या युध्दनितीने दोन इंग्रज अधिकाऱ्यांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कॅप्टन क्रिक्टनला जबरदस्त हादरा बसला. या घटनेची वार्ता ऐकून इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरीया हिने विर बाबूरावला जिंदा या मुर्दा पकडण्याचा आदेश दिला. त्यांनी बाबुरावाला पकडण्यासाठी नव्या दमाचा कॅप्टन शेक्सपीयरला नागपूरवरून बोलावून घेतले. शेक्सपीयरच्या मार्फतीने अहेरीच्या सर्वेसह राणी लक्ष्मीबाईकडे खलीता पाठविण्यात आला. मात्र याचा कुठलाही परिणाम शेडमाके यांच्या सैन्यावर झाला नाही. यानंतर पुन्हा घणघोर युध्द झाले. युध्दात काही सैनिकांना वीरगती मिळाली. मात्र वीर बाबुराव आणि घोटचे महाराजा व्यंकटराव हे इंग्रजांच्या हाती लागले नाही.

बाबूरावांच्या वाहनाने रोहिल्यांचे मतपरिवर्तन -घोट येथे घडलेल्या ऐतिहासिक लढाई नंतर वीर बाबुरावाच्या जीवनात विपरीत घटना घडू लागल्या. क्रांती आंदोलनात फितूरीमुळे अडथळे येऊ लागले. यात त्यांचे आणि सहकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त झाल्या. काका व्यंकटरावने जंगलाचा आसरा घेतला अन् वीर बाबुराव एकटे पडले. परंतु लक्ष्मीबाईकडून वीर बाबुरावाला पकडण्यासाठी रोहिल्यांची सेना पाठविन्यात आली. वीर बाबुराव भोपाल पटनम येथे स्थानिक लोकांच्या आग्रहाने काही काळ थांबले. ते रात्री झोपले असताना रोहिल्यांच्या सेनेने त्यांना पकडले. मात्र शहीद बाबुराव यांनी त्यांना कुठलाही विरोध न करता इंग्रजांविरुद्ध लढण्याचा उपदेश दिला. "मी माझ्या मातृभूमीसाठी लढत आहे. मला इंग्रजांच्या स्वाधीन केले तर, तुम्ही स्वतंत्र व्हाल का?" असा सवाल त्यांनी केला. या विचाराने रोहिल्यांचे मतपरिवर्तन झाले. अन 24 जून 1858 रोजी ते पुन्हा इंग्रजांच्या तावडीतून निसटले.

आपल्यांनीच दगाफटका केला - शहिद बाबुराव हे अहेरीचे जमीनदार लक्ष्मीबाईच्या माणसांकडून सुटल्याचे वृत्त पसरताच चांदाचे जिल्हाधिकारी कॅप्टन कटनचे डोके भडकले. कारण कॅप्टन शेक्सपीयरचा डाव देखील उलटा पडला. मात्र पुन्हा डाव खेळण्यात आले. इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी लक्ष्मीबाई यांनी बाबुराव यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यांचे सैन्य शेडमाके यांच्या सैन्यात मिसळले. मात्र शेडमाके यांचा घातपात करण्यासाठी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. बाबूरावांच्या सर्व गुप्त कारवायांची माहिती इंग्रजांपर्यंत पोचवली जात होती. डाव साधून लक्ष्मीबाईने बाबुरावाला जेवणाचे निमंत्रण दिले. बाबुरावाने नातलगावर विश्वास ठेवून निमंत्रण स्विकारले मात्र नातलगांनीच दगा दिला. जेवण करतेवेळी कॅप्टन शेक्सपियरने आपल्या सैन्यानिशी बाबुराव यांना घेरले. तो दिवस 18 ऑक्टोबर 1858 हा होता.

कापड न टाकता स्वीकारली फाशी -वीर बाबुरावांच्या हातपायाला लोखंडी बेड्या लावण्यात आल्या. पण त्यांची मुद्रा हसतमुख होती. त्यांना चांदा कारागृह म्हणजे आत्ताचे जिल्हा कारागृह येथे आणण्यात आले. बाबूरावांनी येथे आणण्यात येत असल्याची वार्ता सर्वदूर पसरली. या थोर क्रांतिकारकाला अखेरचं बघण्यासाठी गर्दी उसळली. वीर बाबुरावांना शिक्षा देण्यासाठी विशेष न्यायालयाची व्यवस्था जेलमध्ये करण्यात आली. त्यांच्याकडून बयान देणारा कोणी वकील नव्हता. भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी माझा लढा असल्याची स्पष्टोक्ती बाबुरावांनी न्यायालयात ठामपणे दिली. 21 ऑक्टोबर 1858 रोजी जेलच्या समोरील पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्याची व्यवस्था करण्यात आली. पिंपळाच्या मोठ्या फांदीला तागाची दोरी बांधल्या गेली. कॅप्टन क्रिकटने उजव्या बाजुला तर कॅप्टन शेक्यपियर डाव्या बाजुला आपल्या लष्करी पोषाखात उभे होते.जेलर त्यांच्या चेहऱ्यावर काळा कपडा झाकण्यास समोर आला पण त्यांनी मनाई केली. शाहिद वीर बाबुराव शेडमाके देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर गेले.

हेही वाचा -IT Raid In Jalna राहुल अंजलीच्या लग्नाचे बनले वऱ्हाडी, जालन्यात आयकरकडून 390 कोटींचे घबाड जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details