राजूरा (चंद्रपूर) - देशात लॉकडाऊन सुरू आहे. घरातच राहण्याचा सूचना शासन, प्रशासन करत असतानाही घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशाच परिस्थितीत संचारबंदीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसाचे बॅटने डोके फोडल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कोरपना तालूक्यातील गडचांदूर येथे घडली. यानंतर जखमी पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिरुपती माने असे पोलीस जवानाचे नाव आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील वार्ड क्रमांक पाचमधील पाण्याच्या टाकी जवळ काही मुले क्रिकेट खेळताना पोलिसांना आढळले. पोलिसांना बघताच काही मुले पळून गेलीत. तर काही मुले तिथेच थांबली होती. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर निघू नका, असा समज देण्यासाठी पोलिसांनी मुलांना गाठले. मात्र, वाद वाढत गेला. यात एका मुलाने पोलिसांवर बॅटनी हल्ला केला. यात पोलीस गंभीर जखमी झाला. जखमी पोलीस जवानावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरीता चंद्रपूरला हलविण्यात आले. तिरुपती माने असे पोलीस जवानाचे नाव आहे. तर रोहित चिटघरे हा पोलीस जवानही जखमी झाला आहे.