चंद्रपूर : बल्लारपूर पेपरमिलच्या लाकूड डेपोला काल दुपारी तीन वाजता लागलेली आग ( Massive fire at Ballarpur Paper Mill ) 18 तास उलटूनही अजूनही धगधगत ( The fire was still burning for 18 hours ) आहे. ही आग विझविण्यासाठी कालपासून 25 अग्निशमन वाहने कार्यरत आहेत. मात्र, अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यास यश आलेले नाही. या आगीत बल्लारपूर पेपरमिलचे दोन, खासगी एक आणि एक पेट्रोलपंप जळून खाक झाले. लाखो टन लाकूड यात जळून 15 कोटींच्या वर नुकसान झाले आहे.
चंद्रपुरातील पेपरमिलला भीषण आग आगीचे भीषण स्वरूप : काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक पेपरमिलच्या लाकूड डेपोला आग लागली. कागद बनविण्यासाठी सुबाभूळ, निलगिरी आणि बांबूचा वापर होतो. बल्लारपूर-गडचिरोली मार्गाच्या बाजूला असलेल्या कळमना डेपोत याची साठवणूक होते. येथे पेपरमिलचे दोन आणि खासगी दोन असे चार लाकूड डेपो आहेत जिथे लाखो टन लाकूड ठेवले जाते. काल दुपारी यातील एका डेपोला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी काल सकाळी बाजूला असलेल्या जंगलात वणवा लागला होता, वाराही होता. याची ठिणगी डेपोवर पडली असावी असा अंदाज आहे. बघता बघता आगीने भीषण रूप धारण केले. 40 ते 50 फूट आगीचे लोळ उठत होते. रात्रीपर्यंत आगीने तीन लाकूड डेपो गिळंकृत केले. ज्यातील दोन बल्लारपूर पेपरमिलचे, तर एक खासगी आहे. तसेच बाजूचा पेट्रोलपंपदेखील या आगीत जळून खाक झाला, सुदैवाने यात इंधन नव्हते अशी माहिती मिळत आहे. मात्र, यामध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.
80 टक्के आग आटोक्यात : तहसीलदार : रात्रभर आग विझविण्याचे काम अविरत सुरू होते. यासाठी 25 अग्निशमन वाहनांचा वापर करण्यात आला. आज सकाळपर्यंत जवळपास 80 टक्क्यांपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली आहे. सकाळी वारा असल्याने ती पसरू नये याची दक्षता घेतली जात आहे. जंगलात ही आग पसरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. आग आटोक्यात आली असली तरी संपूर्ण दिवसभर हे काम चालणार आहे, अशी माहिती बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
बल्लारपूर पेपरमिलला भीषण आग आग आटोक्यात आणण्यासाठी असे केले प्रयत्न : आग इतकी भीषण होती की आग विझविण्यासाठी कुठल्या एका अग्निशमन वाहनाचा टिकावच लागू शकत नव्हता. त्यामुळे एकाच वेळी एकाच दिशेने पाच वाहनाचे बंब लावण्यात आले. हवेच्या विरुद्ध दिशेने हे बंब लावण्यात आले. तसेच बाजूच्या डेपोला आग लागू नये यासाठी त्यावर सातत्याने पाण्याचा मारा करण्यात आला, ज्यामुळे आगीचे लोळ पसरूनदेखील आग लागू शकली नाही. या आगीच्या मुख्य ठिकाणी पोहचून आग विझविण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.