चंद्रपूर-प्रतिबंधात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेवीकांना यापूर्वी तुटपुंजे मानधन दिले जात होते. याविरोधात आशा स्वयंसेवीकांनी आंदोलन केले होते. अखेर चंद्रपूर मनपा प्रशासन नमले असून आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या आशा स्वयंसेवीकांना आता चार हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. महापौर राखी कंचर्लावार यांनी यासंबंधी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आशा स्वयंसेवीकांच्या लढ्याला यश; प्रतिबंधात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळणार प्रतिमाह चार हजार मानधन - चंद्रपूर आशा स्वयंसेवीका मानधन बातमी
आशा स्वयंसेवीकांना यापूर्वी तुटपुंजे मानधन दिले जात होते. याविरोधात आशा स्वयंसेवीकांनी आंदोलन केले होते. महापौर राखी कंचर्लावार यांनी यासंबंधी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा केल्यानंतर एकत्रित मानधन प्रतिमाह चार हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.
चंद्रपूर शहरात कोविड -१९ साथीच्या रोगाच्या काळात आशा स्वयंसेविकांचे काम महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. या आशा स्वयंसेविका स्वत:च्या जिवाची पर्वा न करता या कॉण्टॅक्ट ट्रेसिंग सर्वेक्षणात मोठ योगदान देत आहेत. याशिवाय शासनाच्या अनेक महत्वपुर्ण आरोग्य अभियानामधे अनेक कामे या आशा स्वयंसेविका न थकता अविरतपणे करतात. यासाठी त्यांच करावं तेवढं कौतुक थोडंच असल्याचे महापौर यावेळी म्हणाल्या. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांचे मानधन अत्यल्प आहे. हा मोबदला वाढविण्यात यावा, अशी मागणी या स्वयंसेविकांनी केली होती. त्याअनुषंगाने महापौर यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनुसार ऑगस्ट महिन्यापासून ते डिसेंबर २०२० अथवा कोव्हीड -१९ चे कामकाज चालू असेपर्यंत ( यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत ) कर्तव्य पार पडणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना एकत्रित मानधन प्रतिमाह चार हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. मागणी मान्य केल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविकांनी महापौर यांचे आभार मानले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक विशाल निंबाळकर, ब्रिजभूषण पाझारे उपस्थित होते.