महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानव-प्राणी संघर्ष आता चंद्रपूर शहराच्या वेशीवर, 'ईटीव्ही भारत' स्पेशल ग्राउंड रिपोर्ट - मानव प्राणी संघर्ष

Chandrapur Animal Human Conflict : चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मानव-प्राणी संघर्षात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. नुकताच एका ५३ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. वाचा 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट...

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 7:16 PM IST

पाहा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट

चंद्रपूर Chandrapur Animal Human Conflict : चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष काही नवीन नाही. मात्र आता हा संघर्ष चंद्रपूर शहराच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. यापूर्वी शहराजवळ वाघ, बिबट्यांचा वावर दिसून येत होता. मात्र २० नोव्हेंबरला झालेल्या वाघाच्या हल्ल्यात मनोहर वाणी या ५३ वर्षीय व्यक्तीचा बळी गेल्यानंतर आता या प्रश्नावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

आतापर्यंत २१ बळी : चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्षात आतापर्यंत २१ जणांचा बळी गेला आहे. मनोहर वाणी २१ वे बळी ठरले. २१ जणांपैकी २० जणांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला असून, एकाचा बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेलाय. वाघाच्या हल्ल्यात मृतकाच्या कुटुंबाला २५ लाखांची नुकसानभरपाई मिळते. मात्र मनोहर वाणी यांच्यावर वाघानंच हल्ला केला की नाही, याबाबत थोडा संभ्रम होता. हा संभ्रम आता दूर झाला आहे. वाणी यांच्यावर वाघानं हल्ला केल्याची पुष्टी झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून १० लाखांचा धनादेश देण्यात आल्याची माहिती चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिली.

१५ ट्रॅप कॅमेऱ्यानं नजर : मनोहर वाणी यांच्यावर जिथे हल्ला झाला त्या ठिकाणी असलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघ टिपल्या गेला. याशिवाय या वाघावर नजर ठेवण्यासाठी अतिरिक्त १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिली. जिल्ह्याच्या जुनोना जंगलात ही घटना घडली. या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची वर्दळ असते. मात्र ही घटना घडल्यानंतर आता या परिसरात संपूर्ण शुकशुकाट दिसतोय.

वनमंत्री मुनगंटीवारांकडे ही मागणी केली : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसर हा जुनोना जंगलाला लागून आहे. या ठिकाणी वाघ आणि बिबट्यांचा मुक्त संचार असतो. चंद्रपूर वनपरिक्षेत्रच्या प्रादेशिक विभागात हा परिसर येतो. या ठिकाणी नागरिकांची देखील वर्दळ असते. ही घटना घडल्यापासून या परिसरात भीतीचं वातावरण आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. वाघ आणि बिबट्यापासून सावधानता बाळगण्याचे केवळ फलक लावले जातात, मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी काहीही केलं जात नाही. या भागात अनेक ठिकाणी पथदिवे नाहीत. या संपूर्ण परिसरात सौरकुंपण लावण्यात यावं, अशी मागणी नागरिकांनी वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा :

  1. चंद्रपूर परिसरात वाघाची दहशत; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं ठार

ABOUT THE AUTHOR

...view details