चंद्रपूर - जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे पद मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहे. हे रिक्त पद भरण्याची पालकांनी वारंवार मागणी केली. मात्र शिक्षण विभागाने याकडे दूर्लक्ष केले. अखेर संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालूक्यातील सेवादासनगर येथे हा प्रकार घडला.
सेवादासनगर येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. सध्या या शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून दोन पदे रिक्त आहेत. परिणामी तिन शिक्षकांच्या खांद्यावरच शाळेचा डोलारा उभा आहे. शाळेतील रिक्त पदे भरण्यासाठी पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने 7 डिसेंबरला संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनात 11 डिसेंबरपर्यंत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, अद्यापही शाळेला शिक्षक देण्यात आलेला नाही. यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकले.