महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमूर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; दारू तस्करांशी संगनमत केल्याचा आरोप - police collusion with liquor smugglers

ठाणेदार धुळे यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक मेश्राम हे दारूतस्करांचा पाठलाग करीत होते. मात्र, मेश्राम यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने ते रजेवर आहेत. अशा स्थितीत मेश्राम यांनी गाडीचा पाठलाग कसा केला? तसेच यासाठी त्यांनी पोलिसांचे वाहन न वापरता स्वतःचे वाहन कसे वापरले? हे प्रश्न आहेतच. शिवाय धुळे यांना मेश्राम कर्तव्यावर कधी रुजू झाले याची माहिती नाही.

collusion with liquor smugglers
चिमूर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

By

Published : May 25, 2020, 11:54 AM IST

चंद्रपूर - चिमूर पोलिसांनी रविवारी जिल्ह्यात येणारी 20 पेट्या दारू जप्त केली. मात्र, पोलिसांच्या करवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास डांगे यांनी या प्रकरणात पोलिसांनी दारू तस्करांशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. प्रत्यक्ष दोन आरोपी असताना केवळ एकाच आरोपीला पकडले तसेच यावर पोलिसांनीथातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चिमूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी साडेसहा वाजता दारू घेऊन एक वाहन नेरीकडून चिमुरला येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार नाकाबंदी केली असता गाडीतून 20 पेट्या जप्त करण्यात आल्या. त्यात 960 बाटल्या होत्या.याप्रकरणात एका आरोपीला पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलीस हवालदार प्रवीण तिराणकर, विलास निमगडे, विलास सोनूले, किशोर बोढे, कैलास आलम हे उपस्थित होते. मात्र, या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास डांगे यांनी या घटनाक्रमाचे खंडन केले आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

याबाबत डांगे यांनी सांगितले, की एका इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने ती गाडी चिमूर-नेरी मार्गावर उभी होती. त्यात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा होता. काही काळाने एक दुसरी गाडी बोलावण्यात आली. या दुसऱ्या गाडीत इनोव्हा गाडीतील दारुसाठा ठेवण्यात येत होता. यादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक किरण मेश्राम काही पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तिथे पोहोचले. ही बाब लक्षात येताच दुसरी गाडी घेऊन चालक फरार झाला. तर, इनोव्हा गाडीतील दोन जण शेतात पळून गेले.

काही वेळात दोघेही परत आले. त्यांनी ही दारू कुणाची आहे हे मेश्राम यांना सांगितले. यानंतर चिमूरचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे हे तिथे पोहोचले आणि डांगे तिथून निघून गेले. मात्र, पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये केवळ एकच आरोपी पकडल्याचे नमूद आहे. आपण या घटनेचा साक्षीदार असल्याच्या भीतीने पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. ही कारवाई संशय निर्माण करणारी असून पोलिसांनी दारुतस्करांशी संगनमत केल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे.

ह्या गोष्टी आहेत संशयास्पद

ठाणेदार धुळे यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक मेश्राम हे दारुतस्करांचा पाठलाग करीत होते. मात्र, मेश्राम यांचा हात फ्रॅक्चर झाला असल्याने ते रजेवर आहेत. अशा स्थितीत मेश्राम यांनी गाडीचा पाठलाग कसा केला? तसेच यासाठी त्यांनी पोलिसांचे वाहन न वापरता स्वतःचे वाहन कसे वापरले? हे प्रश्न आहेतच. शिवाय, धुळे यांना मेश्राम कर्तव्यावर कधी रुजू झाले याची माहिती नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत ठाणेदार स्वप्नील धुळे यांना विचारणा केली असता, काही दिवसांपूर्वी डांगे यांच्या भावाकडील दारू पकडण्यात आली होती. त्यामुळे, विलास डांगे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे ते म्हणाले. मात्र, डांगे यांनी आपला कुठलाही भाऊ या परिसरात राहत नाही. धुळे यांना अशी माहिती असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे, असे प्रतिआव्हान दिले. आता या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details