चंद्रपूर- जिल्ह्यातील कृष्णनगर परिसरात आढळलेल्या एकमेव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 57 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. रविवारी यातील ८ नमुने प्रतीक्षेत होते. ते आठही नमुने प्राप्त झाले असून 57 पैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये सुद्धा 10 मे रोजी केलेल्या पाहणीमध्ये कोणताही संशयित रुग्ण आढळलेला नाही.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये तीन वाजेपर्यंत आलेल्या सर्व अहवालाला समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 89 लोकांची नोंद घेण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. या 89 लोकांपैकी 57 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे. या पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील तीन्ही अहवाल यापूर्वीच निगेटिव्ह आले आहे.