चंद्रपूर -सरकारने चौथ्या लाॅकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना काही अटींवर परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर लग्नाळू लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण, एकाला कोरोनाच्या संकटात लग्न करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण, त्या लग्नात कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील एका व्यक्तीने पंगत वाढली. यामुळे वधुवरासह त्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या नातेवाईकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून नवदाम्पत्यांसह लग्नातील उपस्थित सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
घडलं असे की, गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावाच्या एका तरूणाचा विवाह बल्लारपूरच्या विसापूर येथील तरूणीसोबत ठरला होता. पण, कोरोनाचे संकट आले आणि हा विवाह पुढे ढकलावा लागला. चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने मोजक्या लोकांसह लग्नाला परवानगी दिली. ही संधी साधत वधुवरच्या कुटुंबियांनी १९ मे रोजी विवाह करण्याचे ठरविले. लग्नाची रितसर परवानगी घेण्यात आली. यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत नवरदेव विसापूर येथे गेला. सामाजिक रितीरिवाजानुसार त्यांचं लग्न शांततेत पार पडलं. लग्नानंतर व-हाडयांना जेवण देण्यात आलं.
हेही वाचा -रोज शंभर शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा; चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा ठराव
कोरोनाच्या काळात लग्न संपन्न झाल्याच्या आनंदात, 'दुल्हन हम ले जायेगे' म्हणत वधूला घेत नवरदेव आणि व-हाडी चेकपिपरीला परतले. यानंतर दोनच दिवसात चंद्रपूरात ९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. यात विसापूरच्या एकाचा समावेश होता. प्रशासनाकडून त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला. तेव्हा विसापूरच्या कोरोना बाधीताच्या संपर्कातील व्यक्ती १९ मे रोजी झालेल्या लग्नात पंगत वाढल्याचे समोर आले.