चंद्रपूर - घुग्गूस नगरपालिकेच्या मागणीसाठीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या मागणीसाठी आज सर्वपक्षीय मुंडण आणि अर्धनग्न आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. नगरपालिकेच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांतर्फे ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 28 डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
पुढे-पुढे करणारे नेते सावधतेच्या पवित्र्यात
आज 29 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सर्वपक्षीय नेत्यांनी मुंडण आंदोलन पुकारले. या आंदोलनात मागील काही दिवसात सर्वात पुढे-पुढे करणारे नेते आता मात्र सावधतेचा पवित्रा घेत आहे. लोकप्रतिनिधीदेखील या आंदोलनापासून लांबच असल्याचे दिसत आहे. आजच्या मुंडण आंदोलना सोबत सर्वपक्षीय नेत्यांतर्फे अर्धनग्न आंदोलन ही करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, शिवसेनेचे गणेश शेंडे, यंग चांदा ब्रिगेडचे इम्रान खान, स्वप्नील वाढई, राष्ट्रवादीचे श्रीनिवास गोस्कुला, सामाजिक कार्यकर्ते अशोक रामटेके, भारीपाचे राजू वनकर, युवक काँग्रेसचे सूरज कन्नूर, माजी सरपंच संतोष नून आदींनी मुंडण केले.
का आहे नगरपालिकेची मागणी
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून घुग्गूसचा लौकिक आहे. या परिसरात वेकोलीच्या कोळसा खाणी, सिमेंट कारखाने, पोलाद कारखाने अशा मोठ्या उद्योगांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून देखील घुग्गूसचा उल्लेख होतो. मात्र, ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्याने या परिसराचा अजूनही विकास झाला नाही. लोकसंख्येच्या निकषात बसूनदेखील नगरपालिकेची निर्मिती होऊ शकली नाही. ही मागणी पूर्ण करण्याचे अनेक नेत्यांनी आश्वासन दिले. मात्र, नंतर त्यांनी याकडे पाठ फिरवली. नगरपालिकेच्या मागणीसाठी नागरिक आग्रही आहेत. यासाठी अनेक आंदोलने झालीत मात्र तरीही घुग्गूस नगरपालिका का होऊ शकली नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.