महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत विशेष : राज्यात पहिल्यांदाच कुपोषणमुक्त करणारी 'आशा' - chandrapur aasha news

चंद्रपूर तालुक्यातील 54 कुपोषित बालकांना 33 डॉक्टरांनी आशा, या उपक्रमाद्वारे दत्तक घेतले आहे. या योजनेचा औपचारिक कार्यक्रम 'जागतिक ओआरएस दिनी' होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे देखील उपस्थित असणार आहेत.

DOCTOR
डॉक्टर

By

Published : Jul 28, 2020, 8:26 PM IST

चंद्रपूर -चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात अजूनही कुपोषण नष्ट होऊ शकले नाही. यासाठी शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबविण्यात येते. तीव्र कुपोषित बालक केंद्रस्थानी मानून ही योजना राबविली जाते. मात्र, मध्यम कुपोषित बालकांसाठी फार असे काम नाही केले जात. मग हीच मध्यम कुपोषित मुले तीव्र कुपोषित होण्याचा धोका असतो. या मध्यम कुपोषित मुलांना सदृढ करण्याचा वसा जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांनी घेतला आहे. चंद्रपूर तालुक्यातील 54 बालकांना दत्तक घेण्यात आले आहे. साधारणतः प्रत्येक डॉक्टरने दोन मुलांना दत्तक घेतले आहे. एकूण 33 डाक्टर या उपक्रमात सहभागी झाले आहे.या उपक्रमाला 'आशा', असे नाव देण्यात आले आहे.

राज्यात पहिल्यांदाच कुपोषणमुक्त करणारी 'आशा'

या स्तुत्य उपक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर यांची उत्तम साथ लाभत आहे. हे चित्र अत्यंत आशादायक आहे. राज्यात पहिल्यांदाच शासन आणि बालरोगतज्ज्ञ कुपोषण हटविण्यातसाठी एकमेकांना सहकार्य करीत आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागात 212 अंगणवाडी केंद्र असून त्यात 9 हजार 993 बालके आहेत. यामधील 54 बालके मध्यम कुपोषित तर 9 बालके अतिकुपोषित आहेत. सध्या हा उपक्रम केवळ चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागापूरती मर्यादित आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण जिल्ह्यात, असा पॅटर्न राबविण्यात येणार आहे.

'अशी' सुचली संकल्पना

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेच्या जिल्हा सचिव तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांची भेट बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर यांच्याशी एका कार्यक्रमात झाली. त्यांनी मध्यम कुपोषित मुलांची समस्या बोलून दाखविली. यावेळी अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याची संकल्पना बाहेर आली. ही संकल्पना बालरोगतज्ज्ञ डॉ. गावतुरे यांनी संघटनेच्या सर्व डॉक्टरांना सांगितली. विशेष म्हणजे यातील प्रत्येक डॉक्टरांनी अशा मुलांना दत्तक घेण्याचे स्वागत केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी देखील याचे स्वागत केले. त्यानुसार बुधवारी (दि. 29 जुलै) 'जागतिक ओआरएस दिनी' याचा औपचारिक कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे देखील उपस्थित असणार आहेत.

नेमकी कशी आहे दत्तक प्रक्रिया

बालरोगतज्ज्ञ महिन्यातून एकदा आपण दत्तक घेतलेल्या मुलांच्या घरी जाऊन त्यांची एकूण सामाजिक, अर्थिक परिस्थिती जाणून घेतील. तसेच या मुलांना आपल्या दवाखान्यात आणून आरोग्य तपासणी करणार. मुलांच्या आवश्यकतेनुसार त्याला भेटवस्तू देणार असून त्यांना तातडीच्या उपचाराची गरज पडल्यास यासाठीचा संपूर्ण खर्च डॉक्टर उचलणार. म्हणजे एकूणच ही प्रक्रिया केवळ नावापुरती नसून याचा मोठा लाभ गरजू मुलांना होणार आहे.

यांनी उचलली कुपोषित बालकांची जबाबदारी

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अपर्णा अंदनकर, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. व्यंकटेश पंगा, डॉ. रवी मोहूर्ले, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. पियुष मुत्यालवार, डॉ. अभय राठोड, डॉ. गोपाल राठी, डॉ. भालचंद्र फालके, डॉ. आशिष धानोरकर, डॉ. सुवर्णा सोंडवले, डॉ. प्रशांत दास, डॉ. राजीव देवईकर, डॉ. राहुल तपासे, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. राम भरत, डॉ. अश्विनी भरत, डॉ. भावेश मुसळे, डॉ. एम. जे. खान, डॉ. रफिक मवानी, डॉ. प्रमोद भोयर, डॉ. राहुल मोगरे, डॉ. सीमा शर्मा, डॉ. अंकुश खिचडे, डॉ. ज्योत्स्ना उमरेडकर, डॉ. प्रियदर्शन मुठाळ, डॉ. सोनाली कपूर, डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. इर्शाद शिवजी, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजय करमरकर हयांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details