महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरातील 'त्या' रुग्णाचा खासगी लॅबने दिलेले कोरोना चाचणी अहवाल प्रशासनाने फेटाळला - rehmatnagar corona patient

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मृत रुग्णाचा खासगी लॅबचा अहवाल फेटाळून लावला. ज्या खासगी लॅबला हे नमुने पाठविण्यात आले त्याला शासनाची अधिकृत मान्यता नाही असे ते म्हणाले.

rehmatnagar corona patient
प्रतिकात्मक

By

Published : Apr 10, 2020, 8:57 PM IST

चंद्रपूर- शहरातील रेहमतनगर येथील एका वृद्ध व्यक्तीचा नागपूर येथे मृत्यू झाला होता. रुग्णालयात असताना रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती, मात्र एका खासगी लॅबमध्ये रुग्णाच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यावर खासगी टेस्टला अधिकृत मान्यता नसून या पूर्वी देखील अशा प्रकारचे चुकीचे अहवाल समोर आल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने खासगी अहवाल फेटाळला आहे.

मृत रुग्ण रफिक मेमन यांना शहरातील डॉ. नगराळे यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २८ मार्चला त्यांचे नमुने नागपूर येथील एका खासगी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्यानंतर, मेमन यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. यावेळी मेयो रुग्णालयातर्फे मेमन यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, मेयोतर्फे करण्यात आलेल्या चाचणी अगोदर खासगी लॅबतर्फे करण्यात आलेल्या चाचणीत रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे, खासगी लॅब आणि मेयोद्वारे करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये फरक आढळल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या खासगी लॅबचा अहवाल फेटाळून लावला आहे. ज्या खासगी लॅबला हे नमुने पाठविण्यात आले त्याला शासनाची अधिकृत मान्यता नाही, असे ते म्हणाले. विदर्भातील ११ जिल्ह्यातील नमुने तपासण्यासाठी केवळ एम्स आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयालाच परवानगी आहे. तसेच, २८ तारखेला घेतलेल्या नमुन्याचा अहवाल खूप उशिरा जाहीर करण्यात आला. ज्या खासगी लॅबने हा अहवाल दिला, त्या लॅबला केवळ मुंबई येथेच नमुने तपासण्याची मुभा देण्यात आली आहे.

त्यातही काही चुकीचे अहवाल या खासगी लॅबमधून निघालेले आहेत. त्यामुळे, मेमन यांच्या नमुन्याची अधिकृत पुष्टी केली जाऊ शकत नाही. तसे असते तर १ एप्रिलला घेतलेला अहवालही पॉझिटिव्ह आला असता, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांचे म्हणणे आहे. तरी खबरदारी म्हणून डॉ. नगराळे, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details