चंद्रपूर - आम आदमी पक्षाच्या वतीने महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात पुंगी बजाओ आंदोलन करण्यात आले. पैशाच्या निरर्थक उधळपट्टीविरोधात आपने हे आंदोलन केले. कोरोनाच्या काळात महापौर यांनी अकरा लाखांचे वाहन घेतले तसेच आवडीच्या क्रमांकासाठी अतिरिक्त 70 हजार मोजल्याचे प्रकरण हे नुकतेच समोर आले. याविरोधात आक्रोश करण्यात आला.
महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वेळोवेळी समोर येत आहेत. भोजन घोटाळा, डब्बे वाटप घोटाळा, कचरा घोटाळा अशा अनेक प्रकरणात महापालिकेचे गैरव्यवहार समोर आले आहे. तसेच कोरोनाच्या काळात जेव्हा महापालिका आमच्याकडे आरोग्य व्यवस्थेसाठी तिजोरीत पैसे नाहीत, अशी सबब देत होती त्याचवेळी महापौर यांच्यासाठी 11 लाखांचे नवे वाहन खरेदी करण्यात आले. एवढेच नाही तर 70 हजार रुपये पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी खर्च करण्यात आले असल्याची बाब ही माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा संघटनमंत्री राजेश बेले, हिमायू अली, मयूर राईकवार, आशिष झाडे, अरविंद वांढरे उपस्थित होते.