चंद्रपूर -देशात संचारबंदी लागू झाल्याने सर्व कंपन्यांना टाळे लागले आहे. त्यामुळे आता कामगार, मजूर गावाकडे निघाले आहेत.अशाच एका मजुराने नागपूर ते सिंदेवाही, असा तब्बल 135 किलोमीटरचा प्रवास पायी केला. हे अंतर कापायला त्याला दोन दिवस लागले. यावरून संपूर्ण देशात अशा मजुरांची काय परिस्थिती असेल हे लक्षात येते.
कोरोनाचा फटका : स्वगृही परतण्यासाठी मजुराचा पायी प्रवास, दोन दिवसांनी पोहोचला घरी - कामगाराचा पायी प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे संपूर्ण देशात संचारबंदीची घोषणी केली. मात्र, रोजगाराच्या शोधात बाहेर पडणाऱ्या कामगार, मजुरांसाठी जीवन-मरणाची स्थिती निर्माण झाली आहे. कारण ज्या कंपनी, कारखान्यात काम मिळत होते त्या आता बंद झाल्या. अशा कामगारांसाठी सुरक्षित राहण्याची, जेवण-पाण्याची कुठलीही सोय नाही. त्यामुळे हे कामगार, मजूर आपल्या गावाच्या दिशेने निघाले आहेत.
नरेंद्र विजय शेळके, असे या मजुराचे नाव आहे. तो सावली तालुक्यातील जांब गावचा रहिवासी. मात्र, रोजगाराच्या शोधात तो पुण्यात गेला. तिथे एका कंपनीत काम करीत होता. याच दरम्यान कोरोनाचे सावट देशावर आले आणि कंपन्याला टाळे लागले. त्यामुळे स्वगृही परतण्यासाठी पुण्याहून नागपूरला आला. मात्र, नागपूरला येताच संचारबंदी लागल्याने गावापर्यंत पोहोचण्याचे कुठलेही साधन त्याच्याकडे नव्हते. नागपुरात राहण्याची सोयही नव्हती. त्यामुळे त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी नागपूर येथून गावाला जायला निघाला. पोलीस नेहमीप्रमाणे बुधवारी गस्तीवर असताना त्यांना सिंदेवाहीतील शिवाजी चौकात नरेंद्र आढळून आला. त्याला एक पाऊल टाकणे सुद्धा कठीण होते.
पोलिसांना त्याच्याकडे पाहून हा कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याचे वाटले. त्यानंतर त्याची विचारपूस केली असता, सत्य समोर आले. त्याला आधी रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच होम क्वारंनटाईनचा शिक्का मारण्यात आला. तो खूप अशक्त असल्याने पोलीस उपनिरीक्षक नेरकर यांनी आपल्या पत्नीला सांगून जेवण बनवून आणले आणि त्याला दिले. प्रहार संघटनेने या व्यक्तीला त्याच्या गावी पोहोचविण्याची जबाबदारी घेतली. वाहनातून त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले. मात्र, या घटनेनंतर कामगार, मजुरांच्या परिस्थितीचा प्रश्न निर्माण झाला आहे.