चंद्रपूर -कोरोना महामारीने सर्वत्र आर्थिक दमछाक चालू असताना महावितरणच्या अनागोंदी कारभाराने सामान्य जनताा मेटाकुटीस आली आहे. चिमुर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) येथील वनिता उत्तम शिवरकर या विधवेच्या झोपडीचे विज बिल चक्क ६५ हजार ५२० आले आहे. या अवास्तव आलेल्या बिलाने वनिताला शॉक बसला असून आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे.
चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील वनिता शिवरकर या झोपडीवजा मोडक्या दोन खोल्यांच्या घरात राहतात. कबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. मात्र, विज वितरण विभागाच्या गोंधळ कारभाराचा त्यांना मोठा झटका बसला आहे. महावितरणने तिच्या झोपडीवजा घराचे तब्बल ६५ हजार ५२० रुपयांचे वीजबिल पाठवले. घरात दोन वेळचे जेवणाची सोय मोठ्या मुश्किलीत होत असताना वीजबिलाची इतकी मोठी रक्कम भरायची तरी कशी, असा गहन प्रश्न वनितापुढे निर्माण झाला आहे.