चंद्रपूर : शहराला लागून असलेल्या दुर्गापूर येथे मानव- वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. काही दिवसांपूर्वीच बिबट्याने एका महिलेला ठार केले होते. ही घटना होते न होते तोच पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात आता चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक एक येथे तीन वर्षीय आरक्षा पोप्पूलवार ही चिमुकली आपल्या घरी जेवत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घालून शिकार करण्याचा प्रयत्न ( Leopard Attack On Child ) केला. मात्र, प्रसंगावधानी आईने या बिबट्याला काठीने झोडपून काढले. त्यामुळे त्याने जंगलात धूम ठोकली आणि सुदैवाने या चिमुकलीचे प्राण ( Mother Saved Child From Leopard ) वाचले. मात्र तरीही ती या हल्ल्यात जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा दुर्गापूर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
बिबट्याची दहशत :चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापुरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याची दहशत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत सातपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आहे. वयोवृद्ध व्यक्ती, महिला, लहान मुले या सर्वांना बिबट्याने आपले शिकार केले आहे. या परिसरातील झाडेझुडपे साफ करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. मात्र वेकोलीने याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. आता हा प्रश्न सुटला असे वाटत असताना एका बिबट्याने हल्ला करीत महिलेला जागीच ठार केले. त्यामुळे पुन्हा बिबट्याचा प्रश्न निर्माण झाला होता.