चंद्रपूर- कोरोनाच्या भीतीमुळे एका आईने पोटच्या मुलाला घरात घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल (१३ मे) गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बूज येथे घडली. आईबरोबरच गावानेही निवारा न दिल्याने मुलाला त्याच्या पत्नी व चिमुकल्या मुलीसह तीन तास रखरखत्या उन्हात उभे रहावे लागले. नंतर गोंडपिपरी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर गावातील शाळेमध्ये मुलाची व त्याच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
आईने घरात प्रवेश नाकारलेला मुलगा आणि त्याची पत्नी, मुलगी शाळेच्याबाहेर उघड्यावर बसले होते कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे, हातावर पोट असणाऱ्यांवर मोठे संकट कोसळले. लॉकडाऊनमुळे औरंगाबाद येथील मुलाच्या हाताला काम नसल्याने त्याच्या सामोर उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे, आपली पत्नी आणि चिमुकल्या मुलीसह त्याने चंद्रपूर या आपल्या मूळ गावाची वाट धरली. तब्बल ५०० किलो मीटरचा प्रवास करून मुलगा हा तारसा बूज या आपल्या गावी पोहोचला, मात्र सख्ख्या आईने त्याला निवारा देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले.
कोरोनाच्या भीतीने मुलाच्या आईने त्याला व त्याच्या कुटुंबाला घरात प्रवेश देण्यास नकार दिला. त्यानंतर, ज्या मातीत जन्मलो त्या मातीतील लोक आपली मदत करतील अशी मुलाला अपेक्षा होती. मात्र, गावकऱ्यांनीही त्याला साथ नकारली. मुलागा व त्यांच्या कुटुंबामुळे अख्ख गाव कोरोनाच्या विळख्यात सापडेल, या भीतीने गावकऱ्यांनी त्यांचा तिरस्कार केला. परिस्थिती इतकी बिकट की गावकऱ्यांनी मुलाला व त्याच्या कुटुंबाला प्यायला पाणी सुद्धा दिले नाही. शेवटी मुलाने गावातील शाळेच्या इमारतीत विलगीकरण होण्याची तयारी दर्शवली. मात्र, ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेची इमारत देण्यासही नकार दिला. कुठेही आश्रय मिळत नसल्याने मुलाला आपली पत्नी व चिमुकल्या मुलीसह तीन तास रखरखत्या उन्हात उभे रहावे लागले.
भूकेने व तहाणेने मुलगा व त्याचे कुटुंब व्याकूळ झाले होते. शेवटी गोंडपिपरी पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर ३ तासानंतर शाळा उघडून त्यांची रहाण्याची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, गावातील शाळेत विलगीकृत होण्याआधी मुलाची व त्याच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांना शाळेत निवारा मिळाला आहे. मात्र, सख्ख्या मुलाला आईने घरात प्रवेश न दिल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
हेही वाचा-दिलासादायक..! कोरोना पॉझिटिव्ह युवतीच्या कुटुंबातील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह