चंद्रपूर - अवैध रेती वाहतूक करणार्या ट्रॅक्टरखाली 16 वर्षीय उमेश सोनुर्ले चिडरला गेला. राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे ही घटना घडली. यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 7च्या दरम्यान घडली.
विहिरगाव येथील शेतकरी पुंडलिक सोनुर्ले यांचा मुलगा उमेश नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेला होता. शेताचे काम आटोपून सायकलने परत येत होता. गावाजवळच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने त्याला चिरडले.
वर्धा नदी पात्र व जंगलातील अनेक नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू आहे. हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध रेती वाहतूक केली जाते. या अवैध रेती वाहतूकदारांवर कारवाई होत नसल्याने तस्करांचे मनोबल वाढले आहे.
कुटुंबीयांनी फोडला टाहो -
अपघात होताच ट्रॅक्टर चालक व मजुर पळून गेले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी विहिरगाव येथे चक्काजाम केला. परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तसेच अवैध रेती उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टरवर नंबरची नोंद नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
पोलीस घटनास्थळी दाखल-
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा तसेच इतर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. परिसरात असलेल्या तणावपूर्ण वातावरणमुळे नागरिकांनी संयम ठेवावा. अशी विनंती करण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हेही वाचा-महाराष्ट्राची संस्कृती एमटीडीसी-नाशिक बोट क्लबच्या लोगोवर, पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते अनावरण
हेही वाचा-'कुटुंब केंद्रीत असलेले पक्ष लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका'