चंद्रपूर -वाघांचे नंदनवन म्हणून जगप्रसिद्ध असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांच्या संरक्षणासाठी अत्यंत सुरक्षित समजला जातो. ताडोबा व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनामुळे वाघांची संख्या अधिक झाली असून आता त्यांना अधिवास कमी पडू लागल्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ ताडोबातच नव्हे तर त्यालगतच्या परिसरामध्येही सहज वाघांचा वावर होताना दिसतो. मात्र, ही स्थिती वाघांसाठी जीवघेणी ठरत आहे.
तृणभक्षी वन्यजीवांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेतात जिवंत विद्युततारा सोडून ठेवतात. काहीवेळा नेमके वाघच याचे बळी ठरतात. २०१८ ते २०२० या कालावधीत अशा प्रकारच्या घटनांमध्ये पाच वाघांचा जीव गेला आहे. अशा प्रकारच्या घटनांची नोंद ही अपघात म्हणून नव्हे तर शिकार म्हणून केली जाते. वाघांसोबतच या काळात 32 वन्यजीवांचाही मृत्यू झाला. यामध्ये रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय आणि बिबट्यांचा समावेश आहे. यातील काहींची शिकार केली गेली तर, काहींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अशा घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 50 आरोपींना वनविभागाने अटक केली आहे.
असे आहे ताडोबा -
राज्यातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा उल्लेख होतो. 1 हजार 724 वर्ग किलोमीटर एवढे क्षेत्रफळ या प्रकल्पाचे आहे. कोअर झोन आणि बफर झोन अशा दोन वर्गात या प्रकल्पाची मुख्यत्वे विभागणी केलेली आहे. कोअर झोन म्हणजे जिथे सर्वाधिक घनदाट जंगल आणि जैवविविधता आहे व मानवी वस्ती नाही. तर बफर झोनमध्ये जंगल कमी व काही प्रमाणात मानवी वस्तीही आहे. याभागात अनेकांची शेती देखील आहे.
'या' घटनांमध्ये गेले वाघांचे बळी -
कोअर झोनमध्ये वन्यजीवांची शिकार होतच नाही. मात्र, बफर झोनमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. अनेकदा वन्यजीवांच्या मांसासाठी जाळे आणि फासे लावले जातात. तर काही ठिकाणी जंगलातील तृणभक्षी प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी जिवंत विद्युतप्रवाह तारेतून सोडला जातो. असे करणे हा शिक्षा पात्र गुन्हा आहे. विद्युतप्रवाहांच्या जाळ्यांमध्ये वाघ देखील शिकार झाले आहेत. 2018 ते 2020 या दरम्यान अशा पाच घटना झाल्या आहेत. 2018 मध्ये शेत सर्वे क्रमांक 42 येथे विद्युत प्रवाहामुळे एका वाघाचा मृत्यू झाला. 2019 मध्ये कंपार्टमेंट क्रमांक 123 येथे वाघाच्या बछड्यांचा तारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला. तर 2020 मध्ये सीतारामपेठ येथे एका वाघिणीची आणि सीटीपीएस इराई धरण परिसरात दोन बछड्यांची शिकार करण्यात आली. ताडोबा व्यवस्थापनाच्या चोख बंदोबस्तामुळे अशा अनेक घटना टळल्या आहेत. मात्र, तरीही अशा प्रकारे होणारा वाघांचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे. भविष्यात याबाबत आणखी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण वाघ आहे म्हणूनच जंगल आहे आणि जंगल आहे म्हणूनच पर्यावरण आहे.
उपाययोजनांसाठी प्रयत्न होणे गरजेचे -