चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे अचानक आज तीन वाघांचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. गावाच्या वेशीवर या वाघांनी धुमाकूळ घातला. या झटापटीत वाघाने दोन जणांवर हल्ला करून जखमी केले. यात STPF (special tiger protection force)च्या एका जवानाचा समावेश आहे.
चंद्रपुरातील पळसगावात 3 वाघांचा धुमाकूळ, दोघांना केले जखमी वाघांना गावाबाहेर पिटाळून लावण्यात गावकऱ्यांना यश
चंद्रपूरमधील चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झटापट बघायला मिळाली. वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ आणि STPF चा जवान जखमी झाला आहे. चरणदास बन्सोड (56) असे ग्रामस्थाचे नाव आहे. तर सुनील गज्जलवार असे जखमी STPF जवानाचे नाव आहे. आज सकाळी पळसगाव येथील गाव तलावाजवळ 3 वाघ असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लोकांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यात गावकरी जखमी झाला. या घटनेची माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दलाला देण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचलेल्या STPFच्या जवानावर देखील वाघाने हल्ला करून त्यातील एकाला जखमी केले. सध्या या वाघांना गावाबाहेर पिटाळून लावण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. एक वाघीण आणि तिच्या दोन मोठे झालेल्या बछड्यांचा यात समावेश आहे. हे क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत येते. या गावाच्या आसपास वाघांचे वास्तव्य आहे. गेल्या काही दिवसांपासून गावाच्या लगत या तीन वाघांचे दर्शन होत होते. मात्र आज गावातच या वाघांनी ठाण मांडले. त्यांना बघून गावात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा- प्रत्येक जिल्ह्यातून डेल्टा प्लसचे नमुने गोळा केले जाणार - राजेश टोपे