चंद्रपूर - 26/11 त्याच्यासाठी नेहमीप्रमाणेच तो एक सामान्य दिवस होता. मूळ चंद्रपूरचा अभिनयात आपले नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून धडपडत होता. आता कामही मिळायला लागले होते. मात्र आमदार निवासातील अडगळीच्या खोलीत चोरी झाली आणि ह्याची तक्रार नोंदविण्यासाठी तो नजीकच्या कुलाबा पोलीस ठाण्यात पोचला. बाहेर काहीतरी फटाक्यांसारखे आवाज येत होते. त्यावेळी इंग्लंड आणि भारताची क्रिकेट मॅच सुरू होती. त्यामुळे कोणी जल्लोष करीत असेल असे मनात म्हणत त्याने ह्याकडे दुर्लक्ष केले. मात्र ह्याची भीषणता लवकरच त्याच्या लक्षात आली. काही लोक जखमी अवस्थेत थेट पोलीस ठाण्याकडे धावत आली होती. कुणाच्या पायाला तर कुणाच्या छातीला गोळी लागली होती. सर्व वेदनेने विव्हळत होते. तेव्हा समजले होते की मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आहे. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 2008 ज्याच्या जखमा अजूनही 26/11 ( 26/11 attack ) म्हणून ताज्या आहेत. अशा अटीतटीच्या क्षणी ज्या 'स्ट्रगलिंग ऍक्टर'ने अनेक जखमींना रुग्णालयात पोचवून त्यांचे प्राण वाचविले त्याचे नाव आहे सुशील सहारे.
26/11 च्या हल्ल्यात प्राण वाचविणाऱ्या 'अनसंग हिरो'ची गोष्ट 26/11 ची आठवण काढली की येतो अंगावर काटा -
सुशील सहारे हे या कलावंतांचे नाव. आता चंद्रपूर जिल्ह्यातील कला-सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख त्याने निर्माण केली आहे. मात्र, 2008ला आपले नशीब अजमावण्यासाठी तो मुंबईला गेला होता. त्यावेळी त्याची 'यम है हम' ह्या नाटकातील यमाची भूमिका चांगलीच गाजत होती. मात्र प्रत्यक्ष रिअल लाईफमध्ये वेळ आली तेव्हा हाच सुशील देवदूतासारखा धावून आला. कधी कुठून आतंकवादी येतील, कधी कुठून गोळी लागेल, हल्ला होईल याची शाश्वती नसताना अशा परिस्थितीत सुशीलने लोकांना हॉस्पिटलमध्ये पोचवून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या योग्य उपचारासाठी धडपड केली. त्या दिवशी संविधान दिवसही होता. एका आदर्श भारतीय नागरिकाप्रमाणे त्याने आपले कर्तव्य पार पाडले. मात्र प्रसारमाध्यमांतील काही अपवाद वगळता सुशीलच्या ह्या कार्याची फारशी कोणी दखल घेतली नाही. मात्र सुशिलला याबद्दल न मिळणारा सन्मान, पुरस्कार, स्तुती ह्याची खंत असण्यापेक्षा आपण केलेल्या कार्याचे समाधान अधिक आहे. अजूनही 26/11 ची आठवण काढली की सुशीलच्या अंगावर काटा येतो. त्या संपुर्ण गोष्टी, दृश्ये त्याच्या डोळ्यासमोर जीवंत उभी राहतात आणि पुन्हा तो हादरून जातो.
त्या दिवशी काय झाले -
आपल्या खोलीत झालेल्या चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी सुशील कोलाबा पोलीस ठाण्यात गेला होता. एवढयातच काही लोक लिपोर्ड कॅफेच्या रोडवरून पोलीस ठाण्याच्या दिशेने धावत येत होते. कारण आतंकवाद्यांनी तिथे बेछूट गोळीबार करीत हल्ला चढवला होता. लोक जिवाच्या आकांताने पळत सुटले होते. कुणाच्या हाताला, कुणाच्या पायाला तर कुणाच्या छातीला गोळी लागली होती. तोवर नेमकं काय झालंय हे कुणालाच कळत नव्हतं. ज्याच्या छातीला गोळी लागलेली होती तो वेदनेने व्हीवळत होता. त्याचा रक्तस्राव थांबवण्यासाठी सुशीलने आपला रुमाल त्याच्या छातीला लावला. त्याने पोलिसांना विनंति केली की सर्वप्रथम आपण ह्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. पोलिसांनी देखील माणुसकी दाखवत ह्या सर्वांसाठी आपले वाहन दिले. त्यांना जवळच्या जिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सर्वप्रथम सुशील हॉस्पिटलमध्ये पळत सुटला. तो डॉक्टरला सांगण्याचा प्रयत्न करीत होता मात्र त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. के झालंय हे डॉक्टरांना देखील कळेना. अखेर सुशील बोलला की 'काय झालं हे माहिती नाही, मात्र तीन चार लोकांना गोळ्या लागल्या आहेत. त्यांना दाखल करण्यासाठी तो स्ट्रेचर घेऊन वाहनाकडे धावला. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. जखमी रुग्णांना घेऊन हॉस्पिटल गाठणार सुशील पहिला व्यक्ती होता.
तोवर मुंबईत दहशतवादी हल्ला झालाय याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र पाचच मिनिटात अवतीभवती सायरन, अम्ब्युलन्सचे आवाज ऐकू येऊ लागले. जखमींना हॉस्पिटलमध्ये पोचविण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. तर डॉक्टर हल्ल्याच्या भीतीने एका ठिकाणी जाऊन लपलेले होते. यामुळे संतापलेल्या सुशीलने ह्या डॉक्टरांना चांगलंच धारेवर धरलं. "जे व्हायचं आहे ते तर होईलच. मात्र आमच्यासारखे सामान्य नागरिक जखमी लोकांची मदत करीत असताना आपण त्यांचे प्राण वाचविण्याचा धर्म सोडून आपला प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहात ही बाब लाजिरवाणी आहे", डॉक्टरांना देखील आपली चूक कळली आणि ते येणाऱ्या प्रत्येक जखमींना उपचार करण्यासाठी सरसावले. मात्र जखमींचा ओघ काही केल्या थांबत नव्हता. सर्वत्र हाहाकार माजलेला होता. जे जखमी होते ते एक तर बेशुद्ध होते किंवा वेदनेने विव्हळत होते. त्यामुळे त्यांना नेमकी गोळी कुठे लागली हे सांगायला मार्ग नव्हता.
शिवाय त्यांच्यावर टाइम बॉम्ब किंवा इतर गोष्टींचा प्रयोग करण्याची भीती होती. तो क्षणच असा होता की काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून जखमींना आधी निर्वस्त्र करून त्यांचा एक्सरे काढला जात होता. संपूर्ण रात्रभर सुशील धडपडत होता. आपल्या खोलीत चोरी झालेले सामान हे नक्कीच त्याच्यासाठी मूल्यवान होते मात्र, आता त्याला त्याची जराही चिंता नव्हती. कारण जीवनातील सर्वात मूल्यवान माणूस वाचविण्याचे काम त्याने केले होते. जे काही हरवले होते त्यापेक्षा हॉस्पिटलमधून बाहेर पडताना जे घेऊन निघत होता त्याचे समाधान हे शब्दांत न सांगण्यासारखे होते. सुशीलच्या कार्याची दखल काही प्रसारमाध्यमांनी घेतली खरी मात्र अजूनही तो एक 'अनसंग हिरो'च आहे. जो चित्रपटात हिरो बनायला आला होता त्याने रिअल लाईफमध्ये हिरो बनण्याचे काम केले, मात्र त्याचीही दखल फारशी मुंबईने घेतली नाही. ही मुंबई अजूनही सुरू आहेत फक्त माणसं येतजात असतात. त्यांच्या कार्याचे चीज होतेच असे नाही. सुशील सहारे हे त्यापैकीच एकाचे नाव.
हेही वाचा -Mumbai Terrorist attack : 26/11 हल्ल्याला 13 पूर्ण; हल्यात 197 निष्पाप नागरिकांचा झाला होता मृत्यू