चंद्रपूर - जिल्ह्यातील 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा 16 मे रोजी घेतलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा पुन्हा 17 मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. हा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.
2 मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील कृष्णनगर येथील सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या नागरिकाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण चंद्रपूर शहरातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ठरला. या रुग्णाला कोविड -19 शिवाय अन्य आजाराच्या पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. 14 दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा या रुग्णाचे 16 मे रोजी स्वॅब घेण्यात आले. हा नमुना निगेटिव्ह आला आहे. तसेच 17 मे रोजी आणखी एक स्वॅब नमुना घेण्यात आला आहे. उद्यापर्यंत याबाबतचा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास हा रुग्ण कोरोनामुक्त झाला, असे समजले जाऊ शकते. त्यामुळे आणखी एका अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.