राजूरा (चंद्रपूर) -गोंडपिपरी तालुक्यातील 148 गरीब आदिवासी कुटुंबांना आनंदाची बातमी मिळाली आहे. तब्बल चौदा वर्षानंतर त्यांना घरकूल मंजूर झाले आहेत. यामुळे त्या सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. तालुक्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शेती आणि जंगलात रोजीरोटी करून ते आपले जीवन जगत आहेत. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. अनेक आदिवासी कुटुंब आजही कच्च्या घरातच वास्तव्य करत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सगळचं थांबले असलं तरी आदिवासी कुटुंबातील 148 कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहेत. पावसाळ्यामध्ये आदिवासी भागातील नागरिकांचे आतोनात हालं होतात. अशावेळी गेल्या चौदा वर्षापासून या आदिवासी बांधवांना शबरी योजनेअंतर्गत घरकूल देण्याची मागणी चेकनांदगाव येथील आदिवासी कार्यकर्ते आनंदराव कोडापे यांनी रेटून धरली. वारंवार पाठपुरावा केला.