चंद्रपूर -चंद्रपूर जिल्हा देशात सर्वाधिक वीज उत्पादन करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, याचे दुष्परिणामही चंद्रपुरकरांना भोगावे लागतात. यामुळे प्रदूषणात मोठी भर पडत असते. नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. ऊर्जानिर्मितीचा आणखी एक प्रकल्प जिल्ह्यात येणार आहे. मात्र, सौर ऊर्जावर चालणारा हा प्रकल्प प्रदूषणविरहित असणार आहे.
भद्रावती तालुक्यातील कचराळा येथे 145 मेगावॉटची क्षमता असलेल्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात ऊर्जानिर्मितीपासून तर सिमेंट, पोलाद, चुनखडी सारख्या उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. जिल्ह्यात रोजगारनिर्मिती हवी मात्र, जनतेच्या आरोग्याला अपाय करून नको, अशा प्रकल्पांची सध्या गरज आहे. याबाबत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्पाला चालना मिळण्याकरिता प्रयत्न सुरू केले.