चंद्रपूर - आजच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यात महिला अग्रेसर आहेत. शारीरिक ताकदीमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी लेखले जाते. मात्र, हेच मत बारावीत शिकणाऱ्या तन्नू मुकेश जाधव या विद्यार्थिनीने खोडून काढले आहे. तन्नू जाधव हिने बलदंड शरीरयष्टीच्या युवकाला कुस्तीत चितपट करत सर्वांनाच चकित केले.
बारावीत शिकणाऱ्या तन्नू जाधवने कुस्तीमध्ये मुलाला केले चितपट हेही वाचा -INDvsAUS : टीम इंडिया 'कमबॅक'साठी सज्ज, तर, पाहुण्यांपुढे मालिकाविजयाचे ध्येय
चिमूर तालुक्यातील भिसी येथील विठ्ठल रुख्माई देवस्थानाच्या पटांगणावर 15 जानेवारीला ही कुस्ती स्पर्धा पार पडली. या दंगलीत ब्रह्मपुरी तालुका कुस्तीगीर संघाची खेळाडू असलेल्या बारावीत शिकणाऱ्या तन्नू मुकेश जाधव या विद्यार्थिनीने एका युवकासोबत कुस्ती खेळली. तन्नूने दिलेली झुंज पाहून आमिर खानच्या दंगल चित्रपटातील मुलीच्या कुस्तीची प्रत्येकाला आठवण झाली. तन्नूने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने भिसी येथील हनुमान व्यायाम मंडळ व जोड मारोती देवस्थानच्या सौजन्याने दुपारी एक वाजता भव्य कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीच्या दंगलीत मुलींचे, बालकांचे, वयस्कांचे आणि युवकांच्या कुस्तीचेही मनोरंजक सामने बघायला मिळाले. कुस्तीच्या दंगलीत चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा व वर्धा जिल्ह्यातील कुस्तीपटू सहभागी झाले होते. कुस्ती जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मंडळातर्फे आणि पाहुण्यांतर्फे स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तूही देण्यात आल्या. भेटवस्तूंमध्ये पंखा, ड्रम, डबे, कुकर अशा अनेक जीवनोपयोगी साहित्यांचा समावेश होता.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांतिक तेली समाज संघटनेचे नेते धनराज मुंगले होते, तर उद्घाटक म्हणून ग्रामविश्व संघर्ष वाहिनीचे संयोजक अभियंता गजेंद्र चाचरकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज गभणे, मुख्याध्यापक वाभीतकर, विठ्ठल रुख्माई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गरिबा निमजे, नाटककार आनंद भिमटे, पत्रकार पंकज मिश्रा, मनोज डोंगरे, रवींद्र गोंगले, सारंग भिमटे, संचिता सहकारी बँकेचे संचालक भीमानंद भिमटे, रामचंद्र दिघोरे, वस्ताद मणिरामजी डायरे, अनिल पंधरे, ईश्वर डुकरे, राजूभाऊ बानकर, जेष्ठ रंगकर्मी अहेमद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कुस्तीची खुली दंगल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज दिघोरे, उपाध्यक्ष कैलाश नागपुरे, वामन निमजे, दिनेश शिवरकर, विनोद नागपुरे, संजय नान्हे, शामराव भानारकर, रोशन खेडकर, किशोर दिघोरे, मनोहर नागपुरे व मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.