चंद्रपूर- कोरोनाच्या महामारीने माणसे एकमेकांकडे संशयी नजरेने बघत आहेत. बाहेरच्यांना गावबंदी सूरू आहे. गावात अडकून पडलेल्या बाहेर गावातील मजुरांना हाकलून लावले जात आहे. माहामारीच्या सावटात माणुसकी थिटी पडू लागली आहे. बाहेरगावी अडकून पडलेल्या माणसांची केविलवाणी पायपीट सुरू आहे. तेलंगाणात अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बारा मजुरांची आपबिती अंगावर शहारे आणणारी आहे. उपाशी पोटी त्यांनी तब्बल दीडशे किलोमिटरचे अंतर कापले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे आल्यावर त्यांची पायपीट थांबली. काही समाजसेवकांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. एकीकडे माणसे माणुसकी हरवून बसत असताना दुसरीकडे सामाजिक दायित्व जोपासणारे हात या माहामारीचा सावटात मदतीसाठी सरसावले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
उपाशी पोटी 250 किमीची पायपिट.. हेही वाचा-लॉक डाऊन : रत्ने आणि मौल्यवान परिषद कर्मचाऱ्यांना देणार ५० कोटींचा निधी
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील राजन गट्टा गावातील मजूर हरभरा, गहू कापणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यातील बोथ गावी गेले होते. दरम्यान, कोरोनामुळे देशात टाळेबंदी झाली. जिल्हाच्या सीमा बंद झाल्या.अश्या बिकट स्थितीत शेतमालकांनी त्यांना गावी परत जाण्यास सांगितले. या मजुरात काही वयोवृध्द होते. रेल्वे, बससेवा ठप्प असताना त्यांना शेतातून हाकलून लावण्यात आले. शेवटी त्या बारा मजुरांनी पायी प्रवास सुरू केला. मार्गात येणारे गावे सुनसान पडली होती. खायला काही मिळत नव्हते. बसत उटत त्यांनी दिडशे किमीचे अंतर कापले. त्यानंतर ते चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे पोहोचले.
कोरपनातील सामाजिक कार्यकर्ते आबिद अली यांनी या मजुरांची विचारपूस केली. 12 मजुरातील आकाश दूधपावडे, हरीदास तुमदाळकर यांनी सांगितलेल्या आपबितीने ते ही गहीवरले. कोरपनाचे ठाणेदार गुरनुले, ढवने यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर या सर्व मजुरांची खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांनी केली. झोपण्याची व्यवस्था करण्यात केली. आज पहाटेला त्यांना स्वगावी जाण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले.
अमरावती, बल्हाशहातील मजुरांना आधार...
हैद्राबाद येथे मजुरीला गेलेल्या अमरावतीचा अमित पुरी, बल्हारपुरातील राकेश जबल्लवार, नरेश जंपलवार यांची पायपीट डोळे ओले करणारी आहे. या तिघांनी सिकंदराबाद पासून कोरपना पर्यंत पायी प्रवास केला आहे. टाळेबंदीत पोलिसांकडून होणारी मारहाण बघून हादरलेल्या या तिघांनी पायी प्रवास सुरू केला. त्यांना हैद्राबाद ते सिंकदराबाद पर्यंत वाहन मिळाले. सिकंदराबाद वरुन एका रिक्षाने ते महामार्गापर्यंत आले. तेथून जवळपास 70 ते 80 किमीचा प्रवास त्यांनी पायी केला.