चंद्रपूर - रविवारी महाकाली मंदिर परिसरातून एक 11 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. ही मुलगी शहर पोलिसांना नागपूर येथे आढळून आली. तपासादरम्यान या मुलीने धक्कादायक कबुलीजबाब दिला आहे. दोन महिलांनी आपले अपहरण केले होते. नागपूर येथे पोहोचल्यानंतर आपण त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली अशी माहिती तिने दिली आहे. शहर पोलीस याबाबतच्या सत्यतेचा तपास घेत आहे.
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून ती मुलगी निसटली, पोलिसांसमोर सांगितली आपबिती
रविवारी महाकाली मंदिर परिसरातून एक ११ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूर शहर पोलिसांकडे आली होती. तपासादरम्यान या मुलीने धक्कादायक कबुलीजबाब दिला. या कबुलीजबाबा बाबत सत्यतेचा तपास पोलीस करत आहेत.
शहरातील गरीब वस्तीत रेकी करून लहान मुलींना पळवून नेहण्यासाठी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती नुकत्याच एका घडलेल्या प्रकारातून समोर आली. याच दरम्यान रविवारी महाकाली मंदिर परिसरातून एक अकरा वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. बळवंत मडावी यांची मुलगी सकाळी दुकानात गेली असता ती अचानक बेपत्ता झाली. यानंतर शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या निर्देशानुसार एक विशेष पथक तयार केले. तपासात ही मुलगी नागपूर येथे तिच्या मामाकडे आढळून आली. तिला चंद्रपूर येथे आणल्यानंतर विचारपूस केली असता. आपले दोन महिलांनी अपहरण केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे.
एक महिला आपल्याला चॉकलेटचे आमिष देऊन एका काळ्या रंगाच्या कार जवळ घेऊन गेली आणि अचानक तिने आत कोंबून गाडी पळवायला सांगितले. आत आणखी एक महिला होती आणि एक चालक होता. कुठलाही आवाज केला तर मारून टाकीन अशी धमकी त्या महिला देत होत्या. चंद्रपूरच्या बायपास मार्गे या मुलीला नागपूर येथील चिंधी बाजार येथे नेण्यात आले. तिथे एक दिवस घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे वाहन दुसरीकडे जात असतानाच नागपूर येथील एचबी चौक येथे थांबले असता या मुलीने त्या कारमधून पळ काढला. आणि आपल्या मामाचे घर कसेबसे गाठले. हा घटनाक्रम पोलिसांना सांगण्यात आला असला तरी पोलिसांना मात्र याबाबत साशंकता आहे. कारण नागपूर मार्गावरील वाहनांचे सीसीटीव्ही तपासले असता अशा कुठल्याही काळ्या रंगाची गाडी नागपूरच्या दिशेने जाताना आढळून आली नाही, तसेच मुलीचे कुटुंब हे मूळचे नागपूर येथील याच वस्तीचे आहे दोन महिन्यापूर्वी कामाच्या शोधात चंद्रपूर येथे स्थलांतरित झाले. त्यामुळे मुलीच्या जबाबाच्या सत्यतेबाबत पोलीस आता अधिक तपास करत आहे.