महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्य सरकार वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या वारसांना करणार एक कोटींची मदत

वीरमरण आलेल्या जवानाच्या अवलंबितांना २५ लाखांऐवजी १ कोटींची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमी जवानांनाही २० ते ६० लाखांपर्यंत मदत केली जाणार आहे, असे सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

By

Published : Jul 16, 2019, 9:37 PM IST

Updated : Jul 16, 2019, 9:53 PM IST

संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई - युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीसह देशातील सुरक्षेसंबंधी मोहिमांमध्ये धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक मदतीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता वीरमरण आलेल्या जवानाच्या अवलंबितांना २५ लाखांऐवजी १ कोटींची मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमी जवानांनाही २० ते ६० लाखांपर्यंत मदत केली जाणार आहे, असे सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

संभाजी पाटील निलंगेकर

युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीत तसेच देशांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेदरम्यान प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या तसेच सीमा सुरक्षा बल आणि इतर निमलष्कर दलातील व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून एकरकमी अनुदान दिले जाते. देशाबाहेरील मोहिमेत वीरमरण अथवा अपंगत्व आलेल्या जवानांनाही ही मदत दिली जाते. वर्ष १९९९ मधील २ लाख एवढ्या अनुदानात त्यानंतरच्या शासन निर्णयानुसार वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. सध्या २७ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना २५ लाख इतकी आर्थिक मदत म्हणून एकरकमी अनुदान देण्यात येत होते. तसेच अपंगत्व आलेल्या जवानांना अपंगत्वाचे प्रमाण १ टक्का ते २५ टक्के असल्यास ५ लाख, २६ टक्के ते ५० टक्के असल्यास ८.५० लाख तर ५१ टक्के ते १०० टक्के असल्यास १५ लाख रुपये देण्यात येत होते, अशी माहिती निलंगेकरांनी दिली.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार १ जानवारी २०१९ पासून वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या एकरकमी अनुदानाची रक्कम १ कोटी रुपये करण्यात आली आहे. तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या राज्यातील जवानांना १ टक्के ते २५ टक्के अपंगत्व आल्यास २० लाख रुपये तर २६ टक्के ते ५० टक्के अपंगत्व आल्यास ३४ लाख आणि अपंगत्वाचे प्रमाण ५१ टक्के ते १०० टक्के असल्यास ६० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Last Updated : Jul 16, 2019, 9:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details