मुंबई- 'चोर चोर, पकडा पकडा'च्या आवाजाने सतर्क झालेल्या आरपीएफ जवानाने पाकीट मारून पळून जाणाऱ्या चोराला पकडले. रामदुलारे चव्हाण हा जवान मुंब्रा रेल्वे स्थानकावर सेवा बजावत होता. त्याने पळून जाणाऱ्या चोरट्याला मोठ्या कौशल्याने पकडले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबद्दल रामदुलारेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
CCTV: प्रवाशाचे पाकीट मारून पळणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या, मुंब्रा रेल्वे पोलिसांची कामगिरी - मुंबई
'चोर चोर, पकडा पकडा'च्या आवाजाने सतर्क झालेल्या आरपीएफ जवानाने पाकीट मारून पळून जाणाऱ्या चोराला पकडले.
रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा फायदा अनेक भुरटे चोर घेतात. ७ एप्रिल रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक २ वर उस्मानाबाद येथून आलेल्या ३२ वर्षीय विठ्ठल कांबळे यांचे पाकीट मारून चोर गर्दीतून पळून जावू लागला. आपले पाकीट गेले, हे लक्षात येताच विठ्ठल यांनी 'चोर चोर पकडा पकडा' असा आरडाओरडा सुरू केला. गर्दीतून वाट काढत पळणाऱ्या चोराला तेथेच असणाऱ्या आरपीएफ जवान रामदुलारे चव्हाणांची नजर गेली.
त्यांनी पळणाऱ्या चोराला जवळ येताच घट्ट मिठी मारून धरली. चोराने ती मिठी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, चव्हाण यांनी त्याला सोडले नाही. उबेद सलीम खान असे या २२ वर्षीय चोरट्याचे नाव आहे. जीवन बाग मुंब्रा येथील तो रहिवासी आहे. तपासणीत त्याच्याकडे विठ्ठल कांबळे यांचे चोरलेले पाकीट आढळून आले. प्रसंगावधान राखून एका चोराला जेरबंद करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या रामदुलारे चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.