महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारी कार्यक्रमात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठोकले निवडणूक प्रचाराचे भाषण

दरम्यान रेल्वे मंत्री गोयल आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिमोटद्वारे मुंबईतील परळ टर्मिनसचे उदघाटन केले. पुण्यात पुणे-नागपूर हमसफर गाडीला व्हिडिओ कॉन्फरसिंगने हिरवा कंदील दाखवला. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे रुळाच्या कामाचे भूमीपूजनही झाले.

पियुष गोयल

By

Published : Mar 3, 2019, 10:14 PM IST

मुंबई - रेल्वेच्या सुविधांचा गेल्या ६० वर्षात जेवढा विकास झाला नाही, तेवढा या ५ वर्षात झाल्याचा दावा करत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा भारत असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या सरकारी कार्यक्रमात गोयल यांनी निवडणूक प्रचाराचे भाषण ठोकले.

गेल्यावेळी मुंबईत १९ जानेवारीला एक कार्यक्रम झाला. आता दुसऱ्यांदा मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे गतिमान काम केले आहे. गेल्या ५० वर्षात एवढे काम झाले नाही, असा दावा यावेळी रेल्वे मंत्र्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही रेल्वेचा नफा तोटा पाहिला नाही, त्यांनी केवळ सुविधांवर भर दिला. सुविधांसोबतच स्वच्छतेलाही त्यांनी अधिक महत्व दिले असेही त्यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून परेल टर्मिनसची मागणी होत होती. तब्बल २२-२३ वर्षानंतर मुंबईत टर्मिनस होत आहे. गेल्या ६०-६५ वर्षात मुंबईच्या उनगरीय रेल्वेवर अन्याय झाला आहे. मुंबईकरांची समस्या पंतप्रधान मोदी यांना कळली आहे, त्यामुळेच आज ५५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प येत आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, या विकासात रेल्वेचाही मोठा हिस्सा आहे. आता मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईचा सर्वांगीण विकास होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगले काम केले आहे. त्यासाठी सर्वांनी उभे राहून मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला पाहिजे, असे म्हटले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहावे असेही आवाहन गोयल यांनी यावेळी केले. त्यानंतर रेल्वेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना स्टँडिंग ओवियेशन देण्यात आले.

उदघाटन आणि भूमीपूजनाचा महत्त्वाचा भाग सुरू असतानाच रेल्वे मंत्री गोयल यांनी पुन्हा माईकचा ताबा घेत यूपीए सरकार आणि आताच्या सरकारच्या गेल्या ४ वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यूपीए सरकारच्या काळात २०१३-१४ मध्ये केवळ ६५० किलोमीटरचे विद्युतीकरण झाले. मात्र, गेल्या ४ वर्षात याच्या दहापट म्हणजे ६५०० किलोमीटरचे विद्युतीकरण होण्याच्या मार्गावर आहे. २०१३-२०१४ मध्ये केवळ २ प्रवासी लिफ्ट होत्या, तर आता १२० ठिकाणी प्रवासी लिफ्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १८० ठिकाणी एक्सलेटर लावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details