नवी दिल्ली -पाकिस्तानने १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतावर हल्ला केला होता. यामध्ये भारतीय अर्धसैनिक दलातील ४२ जवानांना वीरगती आली होती. त्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरूद्ध संतापची लाट उसळली होती. त्यानंतर केंद्र सरकारवर पाकवर हल्ला करण्याचा दबाव वाढत गेला.
या हल्ल्याचा भारतासह जगभरातून अनेक देशांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवला. भारताने या भ्याड हल्ल्याचा अवघ्या १२ दिवसांत पाकला चांगलाच धडा शिकवला. भारतीय वायुसेनेने एलओसी पार करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बॉम्बहल्ला केला. सैन्याने ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त केले. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
१२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे पाकिस्ताननेही हल्ला झाल्याचे मान्य केले आहे, पण कोणत्याही प्रकारचे नुकसान न झाल्याचे पाकिस्तानचे म्हणमे आहे.
१२ दिवसांतील घडामोडी
- १५ फेब्रुवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेचे एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी एअर स्ट्राइकचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सरकारकडून तातडीने मंजुरी देण्यात आली.
- १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराने हेरॉन ड्रोनच्या आधारे नियंत्रण रेषेवर (एलओसी) टेहाळणी केली.
- २०-२२ फेब्रुवारी दरम्यान भारतीय वायुसेना आणि गुप्तचर संस्थांनी हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठी संभाव्य ठिकाणे निश्चित केली.
- २१ फेब्रुवारीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमोर हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठीच्या संभाव्य ठिकाणांबाबत माहिती देण्यात आली आणि हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठीचे लक्ष निश्चित करण्यात आले.
- २२ फेब्रुवारी वायुसेनेच्या १ स्क्वाड्रन ‘टायगर्स’ आणि ७ स्क्वाड्रन ‘बॅटल अॅक्सिस’ला हल्ल्याच्या मोहिमेसाठी (स्ट्राइक मिशन) सज्ज करण्यात आली. याशिवाय मोहिमेसाठी २ मिराज स्क्वाड्रनमधील १२ जेट निवडण्यात आले.
- २४ फेब्रुवारीला पंजाबच्या भटिंडा येथून वॉर्निंग जेट आणि उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून विमानात हवेत इंधन भरण्याचा सराव करण्यात आला.
- २५ फेब्रुवारीला ऑपरेशन सुरू करण्यासाठी १२ मिराज विमान तयार करण्यात आली. स्ट्राइक करण्याआधी मिराजच्या वैमानिकांनी लक्ष्य निश्चित केले. पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये लेझर गाइडेड बॉम्बद्वारे (लक्ष्य अचूक साधणारे बॉम्ब) हल्ला करण्यात आला. पहाटे ३.२९ ते ४ दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
- २६ फेब्रुवारी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकवर केलेल्या हवाई दलाच्या मोहिमेची अधिकृत माहिती दिली.