मुंबई - तुनश्री दत्ताच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबाबत मुंबई पोलिसांनी अभिनेते नाना पाटेकर याना क्लीन चिट दिली आहे. सकृतदर्शनी नाना पाटेकर यांनी तनुश्रीच लैगिक शोषण केल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याने अंधेरी कोर्टात सादर केलेल्या बी समरी रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी नानाला निर्दोष ठरवलं आहे.
हॉर्न ओके प्लिज या सिनेमाच्या सेटवर आयटम सॉंगच्या शुटिंग दरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने एका खाजगी वाहिनीशी बोलताना केला होता. परदेशात जरी मीटू मोहीम यशस्वी झाली असली तरीही भारतात ते शक्य नाही असं म्हणत 2008 साली घडलेल्या या प्रसंगाबाबत तिने पुन्हा एकदा मौन सोडलं. त्यांतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात मीटू मोहीम सुरू झाली. या मोहिमेचा वणवा पेटल्यानंतर तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या विरोधात अंधेरीतील ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मग पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली. या प्रकरणी अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले. मात्र यातील एकानेही नानाने तनुश्रीसोबत नक्की कोणतं असभ्य वर्तन केलं ते पोलिसांना सांगू शकलं नाही. त्यामुळेच चौकशीअंती आरोपात तथ्य आढळलं नसल्याने तस कोर्टात सादर करण्यात आलेल्या बी समरी रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलं आहे.