महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उन्हाने 'निवडणुकीच्या ज्वरा'त भर, मतदानाची वेळ दीड तासाने वाढविण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय - महाराष्ट्र लोकसभा

व्हीव्हीपॅट मशीनवर एका मतदानासाठी लागणारा सहा सेकंदांचा वेळ आणि उन्हाळ्याचा विचार करून निवडणूक आयोगाने वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मतदान

By

Published : Apr 10, 2019, 6:37 AM IST

मुंबई - उमेदवारांचा प्रचार आणि राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपाने लोकसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. अशातच तापमानाचा पारा वाढत असल्याने एकूण मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने दीड तासाने मतदानाची वेळ वाढविली आहे. त्यामुळे मतदारांना सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीत मतदान करता येणार आहे.


व्हीव्हीपॅट मशीनवर एका मतदानासाठी लागणारा सहा सेकंदांचा वेळ आणि उन्हाळ्याचा विचार करून निवडणूक आयोगाने वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. पण यावेळी व्हीव्हीपॅट मशीनमुळे एका मतदानाला सहा सेकंदांचा वेळ लागणार आहे. तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी आणि संध्याकाळच्याच सत्रात मतदानाची टक्केवारी वाढते. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सकाळी अर्धा तास, तर संध्याकाळी एक तासाची वेळ वाढवली आहे.


पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर-
ईव्हीएम हॅकिंग होत असल्याच्या साशंकतेने यंदा लोकसभेच्या निवडणुकीपासून व्हीव्हीपॅट मशीनचा अवलंब केला जाणार आहे. मतदान केल्यानंतर संबंधित उमेदवाराच मत दिले, याची खात्री व्हावी, यासाठी चिठ्ठी दिसण्याची व्यवस्था व्हीव्हीपॅट मशीनमध्ये करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सहा सेकंदाचा वेळ लागणार आहे.


या ठिकाणी आहे पहिल्या टप्प्यात मतदान-
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान विदर्भातील सात मतदारसंघात ११ एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. विदर्भात तापमानाचा पारा जास्त असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा येथील मतदारांना फायदा होणार आहे. तर देशात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, मिझोराम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबारमध्ये मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे २०१९ ला जाहीर होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details